उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मंगळवारी संध्याकाळी ढगांच्या गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी अनुभवता आल्या. सप्टेंबर महिन्यातील सर्वात तापदायक दिवस अनुभवल्यानंतर या पावसामुळे तापमान खाली आल्याचा दिलासा मिळाला. मात्र त्याचवेळी शहर आणि उपनगरात विविध ४० ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. झाडे किंवा झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याचा फटका रस्ता वाहतुकीवर झाला. यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. जाता जाता पावसाने दिलेल्या तडाख्याने रात्री घरी परतणाऱ्या मुंबईकरांना पावसात भिजत वाट काढावी लागली.
गेले चार दिवस मुंबईतील तापमान चढत्या भाजणीचे होते. शनिवारी ३५.३ अंश सेल्सिअस, रविवारी ३५.६ अंश. सेल्सिअस, सोमवारी ३७ अंश तर मंगळवारी ३६.५ अंश सेल्सिअस तापमान सहन केलेल्या मुंबईकरांना मंगळवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास आलेल्या पावसाने दिलासा दिला. वीजांच्या कडकडाटासह मुंबईतील बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी आल्या. सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३० या वेळेत कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे ४१ आणि १७ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. कुलाबा वेधशाळेत ताशी ११२ किलोमीटर आणि सांताक्रूझ वेधशाळेत ताशी ६० किलोमीटर वाऱ्याच्या वेगाची तर मुंबईत वेधशाळेच्या डॉपलर रडारवर १० किलोमीटर उंचीच्या वीजांची नोंद झाली असल्याची माहिती वेधशाळेने दिली वेगवेगळ्या ४० ठिकाणांहून झाडे पडण्याच्या तक्रारी आल्याचे पालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.  आणखी किमान तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या काही सरी येण्याचा अंदाज आहे.
पाणीसाठा वर्षभर पुरेल
मुंबई : मुंबईला वर्षभराच्या जलसाठय़ासाठी तलावातील ३० सप्टेंबर रोजीची पातळी गृहीत धरली जाते. मंगळवारी तलावातील एकूण पाणीसाठा १४ लाख ११ हजार दशलक्ष लिटरवर पोहोचला होता. मध्य वैतरणा तलावही पूर्ण भरल्यामुळे पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असूनही तलावातील पाणीसाठय़ात गेल्यावर्षीपेक्षा वाढ झाली आहे. शहरात दररोज सरासरी ३७०० दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाते. त्यामुळे वर्षभरासाठी साधारण साडेतेरा लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आवश्यक असतो. मुसळधार पावसाने १५ दिवसांत तलावातील पाणीसाठा वाढवला.  ३० सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये एकूण १४ लाख ११ हजार २९८ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.