दादर येथील इंदू मिलच्या संपूर्ण जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय घेऊन तीन वर्षे झाली, परंतु अद्याप केंद्र व राज्य सरकारकडून काहीच हालचाल होत नाही, आता ५ डिसेंबपर्यंत स्मारकाच्या कामास सुरुवात झाली नाही, तर ६ डिसेंबरला इंदू मिलचा पुन्हा ताबा घेतला जाईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिला.
रिपब्लिकन सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी दादर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी, आनंदराज यांनी आंबेडकर स्मारकासाठी पुन्हा निर्णायक आंदोलन करण्याची घोषणा केली.
रिपब्लिकनचीही आंदोलनाची तयारी
इंदू मिलच्या जमिनीवर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याच्या कामास लवकर सुरु करा, जवखेडा हत्याकांडातील आरोपींना अटक करा या मागण्यांसाठी रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली २८ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी दिली.