पोर्तुगीजपूर्व वसईच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा एक बृहत् शिलालेख नुकताच वसईतील किरवली गावात सापडला आह़े संस्कृत भाषेतील ओळी असलेला हा शिलालेख शके ११९० (इ.स. १२६८) चा असून, त्यावरील मजकुरावरून ते एक दानपत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. वसई परिसरात आजवर सापडलेला हा सर्वात मोठा शिलालेख असल्याचा दावा करण्यात येत आहे.
‘किल्ले वसई मोहीम’ या वसईतील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या संघटनेचे प्रमुख आणि गड-दुर्गांचे अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी शिलाहार काळातील या ऐतिहासिक ठेव्याचा शोध लावला आह़े  या शिलालेखाची लांबी १२६ सेमी, रुंदी ५६ सेमी आणि जाडी २२ सेमी असून, त्याचे तीन मुख्य भाग आहेत. त्यातील सर्वात वरच्या २६ सेमी लांबीच्या भागात एकीकडे चंद्र, दुसरीकडे सूर्य आणि मध्यभागी मंगलकलशाची चित्रे आहेत़  ‘आचंद्रसूर्य शिलालेखातील करार लागू असतील’, असे त्यातून सुचविण्यात आले आह़े  शिलालेखाचा मधला आणि सर्वात महत्त्वाचा भाग ३० सेमी लांबीचा असून, त्यात १२ ओळींचा संस्कृत भाषेतील मजकूर कोरण्यात आला आह़े  या मजकुरातील काही ओळी पुसल्या गेल्या आहेत़
श्रीदत्त यांनी केलेल्या वाचनावरून हा शिलालेख म्हणजे दानपत्र असून, त्यातील मजकुरात अनेक नावांचा समावेश आह़े  प्रत्येक नावापुढे ‘श्री’ हे संबोधन आह़े त्या अर्थी शिलालेख तत्कालीन अधिकारी व्यक्तींसाठी बनविण्यात आला असावा, असा श्रीदत्त यांचा कयास आह़े शिलालेखाचा सर्वात खालचा भाग सुमारे ७० सेमी लांबीचा असून, तो ‘गद्धेगाळी’चा आहे. शिलालेखाचा भंग करणाऱ्या व्यक्तीस त्यात चित्ररूप शिवी देण्यात आले आहे.
गेल्या आठवडय़ात किरवली गावातील चानकाई देवीच्या मूर्तीची पाहणी करण्यास गेले असताना, तेथील ग्रामस्थांनी श्रीदत्त यांना हा, तलावाशेजारी पडलेला ‘देवाचा दगड’ दाखविला. या दगडाला दर अमावस्येला नारळ फोडण्यात येत असे. पंकज वर्तक, अविनाश सावे आदी आपल्या सहकाऱ्यांसमवेत श्रीदत्त यांनी तो दगड बाहेर काढून स्वच्छ केला.
१९७० मध्ये वसईत शके ११२० चा (इसवी सन ११९८) अनंत देव द्वितीय यांचा शिलालेख सापडला होता़  त्यानंतर प्रथमच वसईत असा शिलालेख सापडला असल्याचा श्रीदत्तचा दावा आह़े