दरवर्षी सरासरी साडेचार हजार घटना; जुन्या विद्युतवाहिन्या, ऑटो स्वीचचा अभाव आगींना कारणीभूत

जुन्या विद्युतवाहिन्यांमध्ये सुधारणा करण्याचे किंवा ऑटो स्वीच लावण्याचे उपाय अमलात आणले जात नसल्याने मुंबईत वीजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागणाऱ्या आगींचे प्रमाण मोठे आहे. मुंबईत तब्बल ९० टक्के प्रकरणांमध्ये शॉर्टसर्किटमुळे आगी लागल्या आहेत. अंधेरी येथील औषध दुकानांमध्ये लागलेल्या आगीनंतर पुन्हा एकदा हेच वास्तव अधोरेखित झाले आहे.

मुंबईत दरवर्षी चार ते पाच हजार आगीच्या घटना घडतात. या घटनांचा आढावा घेतला असता ८५ ते ९० टक्के आगींना ‘शॉर्टसर्किट’ जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. यावर्षी गिरगाव चौपाटीवर ‘मेक इन महाराष्ट्र’च्या व्यासपीठाला लागलेली आग, काळबादेवीत तीन अग्निशमन अधिकाऱ्यांचा मृत्यूला कारणीभूत ठरलेली आग, याच महिन्यात मेट्रो हाऊसला लागलेली आग यांच्यामागे हेच कारण होते. विद्युतपुरवठय़ासाठी वापरल्या जाणाऱ्या कमी दर्जाच्या साधनांमुळे शॉर्टसर्किट होते. बहुतेकवेळी वातानुकूलित यंत्र तसेच पॉवर मेनमध्ये आग लागते. वस्तू दर्जेदार असल्या तरी वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची देखभाल व दुरुस्ती वेळेवर केली जात नाही. त्यामुळे त्याच्यावरील आवरण झिजते. अशा दोन विद्युतवाहिन्या एकमेकांच्या संपर्कात आल्या तर ठिणगी उडून आग लागते. ओव्हरलोडिंगमुळेही आग लागण्याची शक्यता असते.

शहरातील ९० टक्के वेळा आग शॉर्टसर्किटमुळे लागते, मात्र तरीही आपल्याकडे याबाबत फारशी जागरूकता नाही. इलेक्ट्रिकल अर्थ सर्किट ब्रेकर (ईएलसीबी), मिनी सर्किट ब्रेकर (एमएसबी) लावल्यास विद्युतपुरवठा बंद होऊन पुढील दुर्घटना टळते. याशिवाय नियमितपणे विद्युतवाहिन्यांचे परीक्षण करायला हवे. विद्युत कायद्यातही तसा उल्लेख आहे, असे प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी सांगितले.

‘मिनी फायर इंजिन’ हा पर्याय नाही

झोपडपट्टय़ा, अरुंद गल्ल्यांमध्ये लागणाऱ्या आगींवर उतारा म्हणून मिनी फायर इंजिनकडे पाहिले जात असले तरी तो एकमेव उपाय नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. गेली दोन वर्षे मिनी फायर इंजिन आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तीन इंजिन आणण्याचा प्रस्तावही स्थायी समितीत चर्चेला ठेवला गेला आहे व डिसेंबरमध्ये आणखी १७ फायर इंजिने आणली जाणार आहेत. मोठय़ा फायर इंजिनची क्षमता ४५०० लिटर पाण्याची असते. मिनी फायर इंजिनमध्ये ५०० लिटर पाण्याची टाकी असते. त्यामुळे वाहनाचा आकार लहान होतो व ते अरुंद रस्त्यांवरूनही वेगाने जाऊ शकते. सध्या तीन मिनी फायर इंजिन आणली जाणार असून डिसेंबपर्यंत आणखी १७ इंजिने येतील. मात्र मिनी फायर इंजिन हा एक पर्याय असून तो सर्व गल्लीबोळातील आगीवर उतारा होणार नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मिनी इंजिनमध्ये फक्त  ५०० लिटर पाणी साठवण्याची सोय असते. त्यामुळे ते पाणी संपल्यावर या इंजिनमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी वेगळी सोय करावी लागेल. शिवाय पाण्याचा टँकर मोठा असल्याने तो अरुंद रस्त्यांमधून कुठपर्यंत जाऊ शकेल अशीही अडचण आहे, असे एका अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले.

fire-chart

शॉर्टसर्किटमुळे आगीच्या मोठय़ा घटना

  • ’मंत्रालयाला तीन वर्षांपूर्वी लागलेली आग
  •  अंधेरीतील लोटस पार्क इमारतीला लागलेली आग
  • गिरगाव चौपाटीवर ‘मेक इन महाराष्ट्र’च्या व्यासपीठाला लागलेली आग
  •  तीन अग्निशमन अधिकाऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली काळबादेवीतील आग
  •  याच महिन्यात मेट्रो हाऊसला लागलेली आग