अंधेरीच्या मोगरा नाल्यातील गाळ न उपसल्याने या पावसाळ्यात अंधेरी पश्चिमेचा बराचसा भाग पाण्याखाली जाण्याची भीती विरोधी पक्षनेते देवेंद्र (बाळा) आंबेरकर यांनी व्यक्त केली आहे. नालेसफाईची कामे केल्याचा पालिकेने दावा केला असला तरी अंधेरी पश्चिमेचा मोगरा नाल्यातील गाळ अद्याप तसाच शिल्लक आहे. मोगरा नाला हा अंधेरी पूर्वेकडून पश्चिमेकडे येतो. या नाल्यातील गाळ न उपसल्यामुळे अंधेरी सबवेसह टिचर्स कॉलनी, आरटीओ, वैशाली नगर जोगेश्वरी, आझाद नगर, गार्डन कोर्ट, वीरा देसाई रोड, चारबंगला आदी भाग पाण्याखाली जाईल, अशी भीती आंबेरकर यांनी व्यक्त केली आहे. गुरूवारी त्यांनी या नाल्याची पाहणी करून नालेसफाईचा फोलपणा उघड केला. ही बाब त्यांनी पर्जन्यजलवाहिन्या विभाग आणि के पश्चिम विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र त्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे ते म्हणाले.