अंगणवाडय़ांचे संपकरी कर्मचारी आक्रमक

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच्या मागण्या मान्य करण्याऐवजी संप मागे घेण्याचे आवाहन करून महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी आमच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला, अशी थेट टीका करत ‘महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समिती’ने आपला राज्यव्यापी बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार जाहीर केला. संप लांबल्यामुळे राज्यातील ७३ लाख बालकांना आज आठव्या दिवशीही पोषण आहार मिळाला नसून यात जर काही बालमृत्यू झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल असेही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविकांना अवघे पाच हजार रुपये तर मदतनीसांना केवळ अडीच हजार रुपये मानधन मिळते. एवढय़ा कमी पैशात पंकजा मुंडे यांनी आपले घर एकदा चालवून दाखवावेच असे आव्हानही अंगणवाडी कृती समितीच्या निमंत्रण शोभा शमिम यांनी दिले. सह्य़ाद्रीवर अंगणवाडी कृती समिती व महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांची बैठक झाली. या बैठकीत मानधनवाढीबाबत कोणताही तोडगा निघू शकला नाही. अंगणवाडी सेविकांना किमान आठ हजार ते १४ हजार रुपये सेवाज्येष्ठतेनुसार मिळावे अशी मागणी आहे. यामुळे सरकारला बाराशे कोटी रुपये खर्च करावा लागणार असून आम्ही करत असलेल्या कामांचा व वाढत्या महागाईचा विचार करताना किमान एवढी रक्कम मिळाल्याशिवाय संप मागे घेणार नाही असे कृती समितीच्या सदस्यांनी बैठकीत स्पष्ट केले. ११ सप्टेंबरपासून दोन लाख अंगणवाडी सेविकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामुळे गेले आठ दिवस ७३ लाख बालकांना पोषण आहार मिळू शकत नाही तसेच एक वर्षांपर्यंतच्या बालकांचे लसीकरणही ठप्प झाले आहे. यामुळे शेकडो बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडण्याच्या मार्गावर असून किमान या बालकांना पोषण आहार तरी द्या अशी विनंती पंकजा मुंडे यांनी केली. तसेच संप मागे घ्या चर्चा करता येईल असेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी जेव्हा अंगणवाडी कर्मचारी संपावर गेले होते तेव्हा सरकारने साडेनऊशे रुपये व पाचशे रुपये मानधन वाढ करून आमची फसवणूक केली. तेव्हाही सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही संप मागे घेतला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठोस निर्णय घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर जोपर्यंत शिक्कामोर्तब करणार नाहीत, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, असे शोभा शमिम यांनी सांगितले. अनेकदा सरकारकडून पोषण आहारासाठीची रक्कम महिने महिने मिळत नाही, त्या वेळी आमच्या अंगणवाडी सेविका आपल्या पदराला खार लावून बालकांना पोषण आहार देतात त्यावेळी पंकजा मुंडे झोपून का होत्या असा सवालही कृती समितीच्या सदस्यांनी केला. त्या वेळी अंगणवाडी सेविकांनी जर स्वत:चे पैसे खर्च केले नसते तर लक्षावधी बालकांना पोषण आहार मिळाला नसता याची जाणीव त्यांना का नाही, असा सवाल करून आज जर आम्हाला बालकांच्या नावे धमकावण्याचा प्रयत्न केला तर तो सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. संपामुळे कुपोषित बालकांचे मृत्यू झाले तर त्याची जबाबदारी पंकजा मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहील, असा इशाराही कृती समितीने दिला.

  • सरकारकडे समृद्धी महामार्गासाठी द्यायला ४३ हजार कोटी रुपये आहेत, बुलेट ट्रेनसाठी ३७ हजार कोटी हे सरकार देणार असेल तर आमच्या कष्टाचे मानधनही आम्हाला मिळालेच पाहिजे, असे शोभा शमिम यांनी सांगितले. दरम्यान, उद्या पुन्हा कृती समितीबरोबर चर्चा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.