दोन महाविद्यालयीन तरुणींना विनाकारण कोठडीत डांबून त्यांचा अमानूष छळ करणाऱ्या डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या गुंडगिरीच्या बातमीने शनिवारी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या वृत्ताची दखल राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनाही घ्यावी लागली; पण त्याचबरोबर सोशल नेटवर्किंगपासून केंद्रीय रेल्वे मंत्रालयापर्यंत सर्वत्र या गुंडगिरीविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात आला. रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी याप्रकरणी रविवार सकाळी दहा वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश रेल्वे संचालकांना दिले आहेत. तर नागरिकांच्या रोषाच्या भीतीने रेल्वे पोलीस आयुक्तांनी या संपूर्ण घटनेच्या स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले.
आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर येथे निघालेल्या चित्रा कुवर (२३) आणि तिच्या मैत्रिणीला डोंबिवली स्थानकात रेल्वे पोलिसांनी खोटय़ा गुन्ह्याखाली अटक केली आणि अख्खी रात्र त्यांना तुरुंगात डांबून त्यांना मारहाण करण्यात आली. २९ जून रोजी घडलेल्या संतापजनक घटनेचे वृत्त ‘लोकसत्ता’ने शनिवारच्या अंकात प्रसिद्ध केल्यानंतर सोशल नेटवर्किंगपासून सर्व माध्यमांत त्याचे पडसाद उमटले. अशाच अत्याचाराचा अनुभव आलेल्या अनेकांनी लोकसत्ता कार्यालयात दूरध्वनी करून पोलीसी दंडेलीला वाचा फोडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तर ही बातमी वाचून अस्वस्थ झालेल्या भाजप खासदार पूनम महाजन यांनी शनिवारी नवी दिल्लीत रेल्वेमंत्री गौडा यांची भेट घेऊन त्यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यावर गौडा यांनी  रेल्वे संचालकांना रविवार सकाळी दहा वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच राज्य शासनाच्या गृहखात्यालाही कारवाई करण्यास त्यांनी सांगितले आहे. ‘या प्रकरणाने मी सुन्न झालो,’ अशी प्रतिक्रिया गौडा यांनी दिल्याचे पूनम महाजन यांनी सांगितले.
पोलिसांचा केविलवाणा बचाव
डोंबिवली रेल्वे पोलिसांनी याप्रकरणात सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. त्या सराईत आहेत, पाकीट त्यांच्या ओढणीत सापडले, त्यांना कल्याणच्या कोठडीत ठेवले होते, ‘आमच्याकडे त्या रात्री नव्हत्याच’ असा विचित्र बचाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बागवे यांनी केला. पण त्या दिवशी या दोघींनी जीन्स आणि टॉप परिधान केला होता, त्यामुळे ओढणीत पाकीट सापडल्याचा पोलिसांचा दावाही खोटा पडला.
अजूनही थरथरते चित्रा
त्या घटनेनंतर चार दिवस चित्रा जेवत नव्हती. झोपेतून दचकून जागी व्हायची. ‘तुमचे मुंडके कापून फेकून देऊ’ हे पोलिसांचे वाक्य अजूनही तिच्या अंगावर काटा आणत आहे. ‘तुला यातील कोण हवी आहे’, असे डोंबिवली पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या साथीदाराला विचारले, हे सांगताना तर चित्रा संतापाने थरथरत होती. विशेष म्हणजे गेल्या वर्षी चित्राच्या मैत्रिणीला दादर स्थानकात मौल्यवान ऐवज सापडला होता. तो तिने दादर रेल्वे पोलिसांना परत केला होता. तेव्हा तिचे पोलिसांनी कौतुक केले होते. आज तिच्यावरच सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रेल्वे पोलिसांना अखेर जाग..
या प्रकरणाची बातमी प्रसिद्ध होताच महिला संघटना, सर्वसामान्य नागरिकांनी निषेध नोंदवत कठोर कारवाईची मागणी केली. फेसबुक, ट्विटरवरसुद्धा पोलीस अत्याचाराचा निषेध करणाऱ्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आणि कालपर्यंत थंड असलेल्या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग आली. पोलीस आयुक्त प्रभात कुमार यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त रेडेकर यांच्यामार्फत ही चौकशी केली जाणार असून सोमवारी त्या अहवाल सादर करणार आहेत.