आपल्या शिक्षण संस्था र्सवकष वातावरणातील बहुस्तरीय अध्ययन संधी पुरवत नाहीत. त्याचबरोबर आपल्या येथे विद्यार्थ्यांसाठी अशा र्सवकष अध्ययन अनुभवांमध्ये सर्व स्तरांचा सहभाग होण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होत असल्याची खंत राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली.
मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आपण सर्वानी बहुस्तरीय अध्ययनाकडे लक्ष द्यायला हवे. ज्यामुळे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी समाज, राष्ट्र आणि जग यांच्या वद्धीमध्ये व विकासामध्ये परिणामकारक भर घालू शकतील.
 यात विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयांमधील अंतिम टप्प्यापर्यंतचे ज्ञान व संशोधन करणे जेणेकरून संशोधनाच्या, ज्ञानाचा कक्षा अधिक रुंदावतील होतील. निवडलेल्या क्षेत्रात सृजनशील, सेवाभावी, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ज्ञानामध्ये प्रभुत्व हस्तगत करणे व त्यात कौशल्य प्राप्त केले पाहीजे. तसेच अध्ययनाद्वारे समाज व पर्यावरण यांच्याशी बांधिलकी व मूलभूत मानवी नाते प्रस्थापित केले पाहीजे. या तीन गोष्टींची कमी आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये पाहवयास मिळते. र्सवकष अध्ययन वातवरण निर्माण करण्यसाठी सामाजिकदृष्टय़ा उपयुक्त ज्ञानाचे वितरण करणे हा रामबाण उपाय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दीड लाख विद्यार्थ्यांना पदवीदान
पदवी – १,२५,२८३
पदविका – २५६
पदव्युत्तर पदवी – २७,७०८
पदव्युत्तर पदवी – ३४८
पीएच.डी. – ३०६
पदव्युत्तर पदविका – ६१८
एकूण – १,५४,५१९

सुवर्ण पदकांवर मुलींची बाजी
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुवर्ण पदकांचे वितरण करण्यात आले. यामध्ये एकूण ४८ विद्यार्थ्यांना ६० सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. यात ५७ शिष्यवृत्ती आणि तीन गरवारे पारितोषिकांचा समावेश होता. सुवर्ण पदक प्राप्त ४८ विद्यार्थ्यांमध्ये ११ विद्यार्थी व ३७ विद्यार्थिनींचा समावेश होता.