महिला, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आदींच्या समांतर आरक्षण धोरणामुळे ‘पशुधन विकास अधिकारी’ पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) या प्रवर्गाकरिता घेतलेल्या लेखी परीक्षेची (पूर्व) कटऑफ अवघ्या दोन गुणांवर घसरली आहे. या आधी वन अधिकारी पदासाठी खेळाडूंसाठी राखीव असलेल्या जागांसाठी कटऑफ चार गुणांवर आली होती.
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागातील ३७२ पदांकरिता ही परीक्षा घेण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी तिचा निकाल जाहीर झाला. मात्र समांतर आरक्षण लावले नाही म्हणून या परीक्षेच्या आधी जाहीर केलेल्या ९५१ उमेदवारांच्या निवड यादीला जोड म्हणून १५५ उमेदवारांची आणखी एक निवड यादी १३ सप्टेंबरला एमपीएससीने जाहीर केली. पण, या १५५ उमेदवारांच्या निवडीसाठीची कटऑफ अवघी २ गुणांवर आल्याने उमेदवारांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामुळे, समांतर आरक्षणातून प्रवेशेच्छुक असलेले व अवघे दोन गुण मिळविलेले उमेदवारही पशुधन विकास अधिकारी पदासाठीच्या पुढील मुलाखतीसाठीच्या टप्प्याकरिता पात्र ठरले आहेत.