कोटय़वधी रुपयांच्या अमली पदार्थाची तस्करी पुन्हा एकदा अंजू नावाच्या कुत्रीमुळे उघडकीस आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका महिलेला हवाई गुप्तचर विभागाने शुक्रवारी पहाटे अटक केली. तिच्याकडून तब्बल साडेसात कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळावर जाली मंडिया मॉनिक्यू (२३) ही दक्षिण आफ्रिकेची महिला शुक्रवारी पहाटे ४ वा. उतरली होती. केनया एअरवेजच्या विमानाने ती नैरोबीमार्गे झिम्बाब्वेला जाणार होती. तिच्याकडे फारसे सामान नव्हते. एकच बॅग होती. हवाई गुप्तचर विभागाच्या पथकातील अंजू जालीकडे बघून भुंकू लागली. अधिकाऱ्यांनी पुन्हा जालीची कसून तपासणी केली असता तिने बॅगेत कपडय़ांच्या पिशवीत मेथाक्युलोन हा अमली पदार्थ दडविलेला आढळला. १५ किलोच्या या अमली पदार्थाची किंमत साडेसात कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एमबीए पदवीधर असलेली जाली यापूर्वी दोनदा भारतात येऊन गेली होती. एका मित्राने हे पार्सल दिल्याचे तिने सांगितले. हवाई गुप्तचर विभागाच्या ताफ्यातील अंजूने यापूर्वी २२ डिसेंबरला ५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडून दिले होते.