रेल्वेमार्गावरील बिघाड मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी काही नवे नाहीत. असे बिघाड झाल्यानंतर किंवा रेल्वेमार्गावर पाणी तुंबल्यानंतर मध्य रेल्वेच्या गाडय़ा एकामागोमाग एक खोळंबल्याचे चित्रही अनेकदा पाहायला मिळते. आतापर्यंत या बिघाडांची कल्पना नसल्याने केवळ रेल्वे प्रशासनावर चरफडणाऱ्या प्रवाशांना आता मध्य रेल्वे थेट प्रवासादरम्यानच तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती उद्घोषणेद्वारे देणार आहे. मात्र सीमेन्स बनावटीच्या गाडय़ांतच येत्या तीन आठवडय़ांत ही उद्घोषणेची सुविधा सुरू होणार आहे.
मध्य रेल्वेवर जवळपास दर दिवशी सिग्नल यंत्रणेतील बिघाड, ओव्हरहेड वायरमधील बिघाड, रेल्वे रूळांमधील बिघाड, गाडय़ांमधील बिघाड अशा अनेक बिघाडांमुळे वाहतूक खोळंबल्याच्या घटना घडतात. मात्र ‘नेमके काय झाले आहे’, हे गाडीत बसलेल्या किंवा गर्दीत लोंबकळणाऱ्या प्रवाशांना कळत नाही आणि प्रवाशांकडे रेल्वे प्रशासनाला शिव्या मोजण्याशिवाय काहीच मार्ग उरत नाही. गाडीतून उतरून रूळांवरून पुढे चालायचे की, गाडीतच थांबून राहायचे, अशा द्विधा मनस्थितीत प्रवासी ताटकळत राहतात.
५८ गाडय़ांमध्ये ऐकवणार
मात्र आता प्रवाशांना ही उद्घोषणा मध्य रेल्वेच्या ताफ्यातील सीमेन्स बनावटीच्या ५८ गाडय़ांमध्ये ऐकायला मिळणार आहे. या उद्घोषणेद्वारे ‘काही तांत्रिक बिघाडामुळे ही गाडी खोळंबली आहे. मात्र लवकरच सेवा पूर्ववत होईल. तसदीबद्दल क्षमस्व आणि आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद’, अशा प्रकारचा संदेश प्रसृत केला जाईल.
प्रवाशांना दिलासा हवा..
उपनगरीय गाडय़ांची वाहतूक नेमक्या कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे थांबली आहे, यात प्रवाशांना रस नसतो. मात्र काहीतरी बिघाड झाला आहे आणि लवकरच गाडी सुरू होणार आहे, हा दिलासा त्यांना हवा असतो. त्यामुळेच ही उद्घोषणा सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे मरेचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले.