इन्सुलेटरमधील वायर खाल्ल्याने लोकलमधील न्यूमॅटिक ब्रेक प्रणाली निकामी
कल्याणहून मुंबईकडे येणाऱ्या गाडीच्या ब्रेक प्रणालीत बुधवारी अचानक बिघाड निर्माण झाला. मोटरमनने प्रसंगावधान राखत दुसरी ब्रेक प्रणाली कार्यान्वित केल्याने अनर्थ टळला. विशेष म्हणजे बिघाड झालेल्या ब्रेकच्या केबल प्रणालीत मोठय़ा प्रमाणात लाल मुंग्या आढळल्या असून त्यांनी वायर खाल्ल्याने ही घटना घडल्याचा संशय आहे. या घटनेनंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी तातडीने सर्वच गाडय़ांच्या ब्रेक प्रणालीची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
कल्याणहून मुंबईकडे येणारी धिमी गाडी बुधवारी दुपारी माटुंगा स्थानकात थांबवण्याचा प्रयत्न मोटरमनने केला असता या गाडीची न्यूमॅटिक ब्रेक प्रणाली निकामी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. लोकल गाडीत तीन प्रकारचे ब्रेक असल्याने दुसरे स्वयंचलित ब्रेक लागून ही गाडी थांबली. त्यानंतर मोटरमनने गाडी दुसऱ्या ब्रेक प्रणालीवर चालवत मुंबईपर्यंत आणली. मात्र, न्यूमॅटिक ब्रेक प्रणाली निकामी होण्याचे कारण शोधले असता धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या. या ब्रेकशी संलग्न असलेल्या दोन केबलपैकी एका केबलमध्ये बिघाड आढळून आला. तसेच दुसऱ्या केबलचे पटल उघडले असता त्यात लाल मुंग्या मोठय़ा प्रमाणात आढळल्या. या लाल मुंग्यांनी ही वायर खाल्ल्याने ती थोडीशी जळल्याचेही आढळले. वर्षभरापूर्वी पश्चिम रेल्वेवरही असाच प्रकार घडला होता. मात्र, या प्रकारामुळे मध्य रेल्वेतील देखभाल-दुरुस्तीच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
याबाबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी तातडीने चौकशीचे आणि तपासाचे आदेश दिले आहेत. ब्रेकमधील बिघाडामागे मुंग्या कारणीभूत नसल्याचे स्पष्ट करीत ब्रिगेडिअर सूद यांनी यापुढे प्रत्येक लोकलची ब्रेक प्रणाली तपासण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुंग्या मारण्यासाठीही योग्य उपाययोजना केल्या जाव्यात, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे. ही लोकल काही दिवस माटुंगा येथील कार्यशाळेत उभी असताना त्या वेळी या मुंग्या शिरल्या असाव्यात, असा अंदाज रेल्वे अधिकारी व्यक्त करीत आहेत.