वरिष्ठ पोलीस आणि सनदी अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्यावरून उलटसुलट चर्चा रंगलेली असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांची पर्यावरण विभागात तर आर. ए. राजीव यांची गृह विभागात बदली करण्यात आली आहे. बडय़ा बिल्डरांशी तसेच साखर कारखान्यांशी घेतलेले वैर राजीव यांना महागात पडला असून अवघ्या वर्षभरातच त्यांची बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मेधा गाडगीळ यांची पर्यावरण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी गृह विभागात प्रधान सचिव (अपिले आणि सुरक्षा) म्हणून राजीव यांची बदली झाली आहे.
राजीव यांनी पर्यावरण विभागात आल्यानंतर वर्षभरात पर्यावरण विभागाच्या मान्यतेच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक गृहनिर्माण तसेच उद्योगांच्या प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवला होता. मात्र राजकीय तसेच बडय़ा बिल्डरांचा दबाव झुगारून नियमबाह्य़ प्रकल्पांवर कारवाईही चालवली होती. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर बिल्डरांशी वैर नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी विश्वासातील असूनही राजीव यांना अन्यत्र हलविल्याचे बोलले जाते. त्याचप्रमाणे साखर कारखान्यांकडून होणारे प्रदूषण तसेच पर्यावरण विभागाची मान्यता न घेता सुरू झालेल्या ५० सिंचन प्रकल्पांविरोधात सुरू केलेली कारवाईही राजीव यांच्या बदलीचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
अभिजित बांगर पालघरचे पहिले जिल्हाधिकारी
नव्यानेच अस्तित्वात येणाऱ्या पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून अभिजित बांगर यांची तर मिरा- भाईंदर महापालिका आयुक्त म्हणून सुभाष लाखे यांची बदली करण्यात आली आहे. सुरेश काकाणी यांची सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रावण हर्डीकर यांची मुख्य सचिव कार्यालयात उपसचिव म्हणून तर जी. श्रीकांत यांची सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.