गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने मंजुरीच्या प्रतिक्षेत असलेल्या जादूटोणाविरोधी विधेयकासंदर्भात वटहुकूम काढण्यावर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाल्याची माहिती मिळाली आहे. 
समाजातील अंधश्रद्धा, भोंदूगिरी याविरोधात नेमस्तपणे आवाज उठविणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मंगळवारी पुण्यामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर सातत्याने प्रयत्नशील होते. या संदर्भात विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनावेळी विधीमंडळ सदस्यांची भेट घेऊन हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी ते प्रयत्न करीत असत. मात्र, प्रत्येकवेळी वेगवेगळ्या कारणांमुळे या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणे लांबणीवर पडत गेले. त्यातच डॉ. दाभोलकर यांची मंगळवारी हत्या झाल्यामुळे या विधेयकाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला.
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी जादूटोणाविरोधी विधेयकासंदर्भात वटहुकूम काढण्याची मागणी मंत्रिमंडळाकडे केली. त्याला मंत्रिमंडळातील सर्वच सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला. हा वटहुकूम काढण्यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे स्वतः राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते. वटहुकूम आल्यानंतर विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून किंवा हिवाळी अधिवेशनात हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करून घेऊन त्याचे कायद्यात रुपांतर केले जाईल.