कर्जत तालुक्यातील  आंबिवली गावात प्राचीन अवशेष सापडले असून गावाजवळील चिल्लारनदीकाठी असलेल्या बौद्ध विहारातही काही मूर्ती आहेत. त्यावरून या परिसरात शिलाहारकालीन मंदिर असावे, अशा निष्कर्षांप्रत इतिहासतज्ज्ञ आले आहेत.
 काही दिवसांपूर्वी गावातील कोंडीराम तानाजी खेडेकर यांनी त्यांच्या घराशेजारी गोठा बांधण्यासाठी पाया खोदायला सुरुवात केली असता तिथे एकामागून एक लहान-मोठय़ा आकाराच्या आठ दगडी पिंडी आढळून आल्या आहेत. काही पिंडी आयताकृती, तर काही गोल आहेत. एकाच ठिकाणी एवढय़ा संख्येने पिंडी आढळून येण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. या पिंडी साधारण तीन-चारशे वर्षांपूर्वीच्या आहेत. आंबिवली गावातील तलावाशेजारी काही प्राचीन मूर्ती गावकऱ्यांना आढळल्या असून त्या मात्र शिलाहारकालीन म्हणजेच किमान हजार वर्षांपूर्वीच्या असल्याचा निर्वाळा प्राच्य इतिहास संशोधक डॉ. दाऊद दळवी यांनी दिला आहे.
कर्जतपासून २५ किलोमीटर अंतरावर आंबिवली गाव आहे. या गावातच चिल्लार नदीकाठी इ.स. दुसऱ्या शतकात बांधलेले बौद्धकालीन विहार आहे. गौतम बुद्धांची शिष्या आम्रपालीच्या नावाने हे विहार ओळखले जाते. त्याच नावावरून या गावास आंबिवली संबोधले जाऊ लागले. प्राचीन इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या विहारातील स्तूप मात्र सध्या तुटला आहे. त्याबद्दल डॉ. दाऊद दळवी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बौद्ध विहारात कोणतीही मूर्ती नसते.
 आंबिवलीतील या विहारात मात्र मूर्ती आहेत. अर्थातच त्या नंतर कुणी तरी आणून ठेवल्या आहेत. विहारातील तसेच तलावाकाठी आढळणाऱ्या मूर्ती शिलाहारकालीन असून त्यावरून या भागात एखादे मंदिर असावे, असा अंदाज डॉ. दळवी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्यासह सदशिव टेटविकर, कर्जत महाविद्यालयाचे प्रा. जीतेंद्र भामरे आणि  प्रा. गजानन उपाध्ये यांनी या प्राचीन ऐतिहासिक दस्तऐवजांची पाहणी केली. परिसरातील इतिहासप्रेमींनी कर्जतमध्येच या प्राचीन अवशेषांचे जतन करावे, अशी सूचना डॉ. दाऊद दळवी यांनी या वेळी केली.

पिंडी म्हणजे स्मारक..
प्राचीन काळी मृत व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ पिंड तयार करण्याची पद्धत होती. आंबिवलीतील पिंडी ही अशाच प्रकारची येथे राहणाऱ्या तत्कालीन महनीय व्यक्तींचे स्मारक असावे, असाही अंदाज व्यक्त केला आहे.    

cap
कर्जत तालुक्यातील कोंडीराम  खेडेकर  यांच्या घराशेजारी आढळलेल्या पिंडी