देशात असहिष्णूता वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त करणाऱ्या अभिनेता आमीर खानवर बॉलिवूडमधील काही कलाकारांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आघाडीवर आहेत अभिनेते अनुपम खेर. अनुपम खेर यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आमीर खानच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ‘अतुल्य भारत’ तुझ्यासाठी असहिष्णू कधी झाला, असा प्रश्न त्यांनी आमीर खानला विचारला आहे. त्याचबरोबर यापू्र्वीही यापेक्षा कठीण परिस्थितीत तू देशात राहिला आहेस. तेव्हा हा देश सोडून जाण्याची तुला इच्छा झाली नाही, असे तू किरण रावला सांगितले का, असेही त्यांनी विचारले आहे.
‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमिरने आपले मन मोकळे केले. देशातील असहिष्णुतेच्या वाढत्या घटनांमुळे चिंतीत झालो असून, माझी पत्नी किरणने देश सोडण्याविषयीही सुचवले होते, असे आमीरने म्हटले होते. त्यावर अनुपम खेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. ते म्हणाले, किरणला कोणत्या देशात जावे असे वाटते, हे तू तिला विचारलेस का? या देशानेच तुला ‘आमीर खान’ बनवले, हे तू तिला सांगितलेस का? हा देश आता असहिष्णू झाला आहे, असे तुझे म्हणणे आहे. तर तू देशातील लाखो लोकांना काय सल्ला देशील? देश सोडून जाण्याचा की अजून काही दिवस वाट पाहण्यास सांगशील, असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनीही आमीर खानवर टीका केली. ते म्हणाले, आमीर, शाहरूख आणि सलमान हे तिनही खान हिंदू देश समजल्या जाणाऱ्या भारतातील स्टार असतील, तर हा देश असहिष्णू कसा असू शकतो. देशातील लाखो लोक या तिन्ही स्टार्सवर प्रेम करतात, यातूनच हा देश असहिष्णू नाही, हे सिद्ध होते. देशातील काही भागांमध्ये असहिष्णूतेच्या घटना घडल्या म्हणून संपूर्ण देशच असहिष्णू होतोय, असे म्हणता येणार नाही, असेही त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
अभिनेते आणि भाजप खासदार परेश रावल यांनीही आमीरवर टीका केली. ते म्हणाले, खरे देशभक्त देश सोडून जात नसतात. तर परिस्थिती बदलण्यासाठी काम करतात. त्यामुळे आमीरनेही देश सोडून न जाता येथील परिस्थिती बदलण्यासाठी काम करावे. आमीरची प्रमुख भूमिका असलेल्या पीकेमध्ये हिंदूंच्या भावनांवर टीका करण्यात आली होती. तरीही देशातील लोकांनी त्याला विरोध केला नाही. अनेकांनी हा चित्रपट पाहिला आणि त्यामुळे आमीर खानला कोट्यवधी रुपये मिळाले होते.