कर्जाच्या बोज्याखाली दबून, तसेच दुष्काळामुळे वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना मदतीचा हात देण्यासाठी ‘आम आदमी पार्टी’ (आप) पुढे सरसावली आहे. यंदा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या १२वीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय ‘आप’ने घेतला आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी आणि मजुरांची आजपासून सात दिवसांमध्ये भेट घेण्याचा निर्णय ‘आप’च्या महाराष्ट्रातील नेत्यांनी घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शेतकरी आणि मजुरांच्या भेटीगाठींची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांच्या जालनाजवळील सिंदखेड राजा येथे २४ मे रोजी करण्यात येणार आहे, असे ‘आप’च्या महाराष्ट्र कार्यकारिणी समितीचे सदस्य रवी श्रीवास्तव यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी संधी मिळायला हवी. या मुलांच्या शिक्षणासाठी येणाऱ्या खर्चासाठी निधी जमविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.