मुंबईतील टाटा मूलभूत विज्ञान संस्थेतील संचालकांची नियुक्ती करताना व्यवस्थापन परिषदेने योग्य पद्धतीचा वापर केला नसल्याचे स्पष्ट करत केंद्र  सरकारतर्फे संचालक नियुक्ती रद्द करत योग्य पद्धतीने नियुक्ती करण्याचे आदेश दिल्याचे समजते. देशातील काही नामांकित विज्ञान संस्थांपैकी एक असलेल्या मुंबईतील टाटा मूलभूत विज्ञान संस्थेत संचालकांच्या नियुक्तीबाबत व्यवस्थापन परिषदेच्या विरोधात नाराजीचा सूर असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते.
संस्थेच्या संचालकांची नियुक्ती करण्याचे अधिकार व्यवस्थापन परिषदेचेच आहेत. मात्र ही नियुक्ती करताना त्यांनी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने नियुक्तीबाबत संस्थेतील अनेक प्राध्यापकांनी ई-मेलद्वारे नाराजी व्यक्त केली होती. पण परिषदेने या तक्रारींकडे लक्ष दिले नव्हते. प्रत्यक्षात ही नियुक्ती करताना जाहिरात देऊन अर्ज मागवून प्रक्रिया करणे अपेक्षित होते. मात्र सध्याच्या संचालकांची नियुक्ती  करताना कोणत्याही प्रकारची जाहिरात देण्यात आली नव्हती. तसेच इतरही प्रक्रियांची अंमलबजावणी केली नसल्याचे केंद्राने स्पष्ट केल्याचे सूत्रांकडून समजते. या संदर्भात माहिती देण्यासाठी संचालक संदीप त्रिवेदी यांनी सर्व प्राध्यापकांची बैठक घेऊन त्यांच्या नियुक्तीबाबत आक्षेप आले असून सध्या ते काळजीवाहू संचालक म्हणून काम पाहतील अशी माहिती दिली. याचबरोबर व्यवस्थापन परिषदेने एक महिन्यांच्या अवधीत प्रभारी संचालकांची नेमणूक करून मला या पदावरून मुक्त करावे अशी मागणी केल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. या संदर्भात संस्थेचे कुलसचिव अँटोनी जॉर्ज यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप आमच्याकडे अधिकृतपणे अशी कोणतीही माहिती उपलब्ध झाली नसल्याचे स्पष्ट करत या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला. त्रिवेदी यांच्याशी संपर्क साधला असता ते दूरध्वनीवर उपलब्ध होऊ शकले नाही.