ठाणे येथील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेले सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, हनमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला या चारही नगरसेवकांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे चौघांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेत असल्याचे सांगत शरणागती पत्करण्यासाठी अवधी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ती न्यायालयाने मान्य करत या चौघांना शनिवारी सकाळी ९ वाजता ठाणे पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तोपर्यंत दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचेही बजावले आहे.

विशेष म्हणजे या नगरसेवकांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करायची आहे, असे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सोमवारच्या सुनावणीत न्यायालयाला सांगितले होते. एवढेच नव्हे, तर नजीब मुल्ला यांच्या खात्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यात १.७ कोटी रुपये जमा झालेले आहेत, असा दावा करत या व्यवहाराचा परमार यांच्या आत्महत्येशी काही संबंध आहे का, याचीही चौकशी करायची असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. तसेच अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी केली होती.
मंगळवारच्या सुनावणीत न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी या प्रकरणाचे गांभीर्य तसेच आरोपींवर ठेवण्यात आलेल्या आरोपांची गंभीरता लक्षात घेता त्यांना दिलासा देणे योग्य ठरणार नाही, असे नमूद केले व चौघा नगरसेवकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.
शिवाय या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईपर्यंत स्थगिती देण्याची मागणीही फेटाळून लावली. त्यामुळे या चौघाही आरोपींनी दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर होत अटकपूर्व जामीन मागे घेत असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा त्यांचा विचार नसल्याचा दावा करत शरणागतीसाठी त्यांना सोमवापर्यंतची मुदत देण्याची विनंती त्यांचे वकील अ‍ॅड्. शिरीष गुप्ते यांनी न्यायालयाकडे केली. परंतु ठाकरे यांनी त्याला विरोध केला. त्यानंतर न्यायालयाने चारही नगरसेवकांची अर्ज मागे घेण्याची विनंती मान्य केली. तसेच त्यांना शनिवारी सकाळी ९ वाजता तपास अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करण्याचे आदेश दिले.

‘ती’ रक्कम व्यवसायातील नफ्याची -आव्हाड
राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या वैयक्तिक बँक खात्यातून ती रक्कम आलेली नसून बांधकाम व्यवसायातील नफ्याची असल्याने त्यामध्ये काहीच गैर झालेले नाही, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणातील चार नगरसेवक आरोपींमध्ये नजीब मुल्ला यांचा समावेश असून त्यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी मुल्ला आणि आव्हाड यांच्या बँक खात्यातील व्यवहाराविषयी उल्लेख केला होता. त्या पाश्र्वभूमीवर आमदार आव्हाड यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
नजीब मुल्ला यांच्या बँक खात्यातून आमदार आव्हाड यांच्या खात्यात १.७० कोटी रुपये जमा झाले असून या व्यवहाराचा परमार यांच्या आत्महत्येशी संबंध आहे का, हे पडताळून पाहायचे आहे, असे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सोमवारी उच्च न्यायालयात सांगितले होते. त्यामुळे आमदार आव्हाड यांनी मंगळवारी प्रसिद्धीपत्रक काढून ही रक्कम मेसर्स ड्रीम होम या कंपनीच्या नफ्याची असल्याचा दावा केला आहे. २००९ मध्ये मेसर्स ड्रीम होम नावाच्या कंपनीची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये नगरसेवक नजीब मुल्ला, मिलिंद पाटील, त्यांचे बंधू विशाल पाटील आणि स्वत: असे चौघे भागीदार आहेत.