जय भगवान महासंघातर्फे तीन सदस्यीय समिती नियुक्त; प्रवाशांशी उद्धटपणा टाळण्याचे शिक्षण

ओला-उबर यांच्या विरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या जय भगवान महासंघाने रिक्षा-टॅक्सी चालकांच्या पायाशी जळणाऱ्या गोष्टीवर उपाय करण्याचा निर्णय घेतला आहे. १० ऑगस्टपासून उबर-ओला या खासगी टॅक्सी समन्वयक कंपन्यांच्या विरोधात बेमुदत संपाची हाक देताना या संघटनेने रिक्षा-टॅक्सीचालकांना विनम्रतेचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. भाडे नाकारणे, प्रवाशांसह उद्धटपणे बोलणे आदी गोष्टी सर्रास करणाऱ्या रिक्षा-टॅक्सीचालकांना आता जय भगवान महासंघाची त्रिसदस्यीय समिती वागण्याचे प्रशिक्षण देणार आहे.

जवळची भाडी नाकारणे, प्रवाशांशी अरेरावी आणि उद्धटपणा करत बोलणे, हमरीतुमरीवर येणे या रिक्षा-टॅक्सीचालकांच्या अवगुणांमुळे सर्वसामान्य प्रवासी नेहमीच त्रस्त असतात. त्यातच ओला-उबर अशा खासगी टॅक्सी समन्वयक कंपन्यांनी नेमक्या याच गोष्टी टाळून अल्प दरात सेवा देण्यास सुरू केल्यावर मुंबई महानगर प्रदेशातील अनेकांनी या कंपन्यांना पसंती दिली. त्यामुळे काळ्या-पिवळ्या रिक्षा-टॅक्सीचालकांचा या कंपन्यांवर रोष आहे.

या रोषाचा आधार घेत जय भगवान महासंघाने या समन्वयक कंपन्यांनाही सर्व सरकारी नियम लागू करावेत, या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यावर या संघटनेने मंगळवारचे आंदोलन स्थगित केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा दिवसांचा अवधी मागितल्यानंतर महासंघाने आणखी पाच दिवसांचा अवधी देत आता १० ऑगस्टपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

या संपाबरोबरच रिक्षा-टॅक्सीचालकांची वर्तणूक सुधारण्यासाठीही जय भगवान महासंघाने पुढाकार घेतल्याचे संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आता संघटनेच्या तीन सदस्यांची एक समिती तयार होणार आहे. ही समिती १०० रिक्षा-टॅक्सीचालकांच्या तुकडय़ांना टप्प्याटप्प्यात प्रशिक्षण देणार आहे. यात ग्राहकांशी कसे वागावे, भाडे नाकारू नये, अरेरावी करू नये अशा गोष्टी त्यांना शिकवल्या जाणार आहेत, असेही सानप यांनी सांगितले.