नागपूरला खनिकर्म विद्यापीठ; राज्य सरकारशी सामंजस्य करार

सेंट पीटर्सबर्ग येथील जगप्रसिद्ध हर्मिटेज संग्रहालय आणि मुंबई महापालिका यांच्यात कला व संस्कृती संवर्धनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला. तर नागपूरमध्ये खनिकर्म उद्योगाचा विकास साधण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्यासाठीही पीटर्सबर्ग खनिकर्म विद्यापीठ व राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

जगप्रसिद्ध हर्मिटेज संग्रहालयात तीस लाखांहून अधिक वस्तूंचा संग्रह असून त्यात दुर्मीळ हस्तचित्रेही आहेत. त्यामुळे इतिहास, कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी हे संग्रहालय व महापालिकेचा झालेला करार फलदायी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

रशियातील या उद्योगाच्या विकासात १७७३ मध्ये स्थापन झालेल्या खनिकर्म विद्यापीठाचे मोठे योगदान आहे. त्यामुळे नागपूरमधील विपुल खनिज संपत्तीतून या उद्योगाचा विकास होण्यासाठी पीटर्सबर्ग विद्यापीठाची मदत घेण्यात येणार आहे. तसेच रशियातील रोस्टेक या रशियातील आघाडीच्या संरक्षण, नागरी व अन्य क्षेत्रांतील आघाडीच्या कंपनीची सहयोगी असलेल्या कर्न्‍सन रेडिओ इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजिस (केआरईटी) कंपनी महासंचालक कॉन्स्टटाइन बोकारोव्ह यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. लष्करी व नागरी उपयोगासाठी आवश्यक रेडिओ इलेक्ट्रॉनिक उत्पादनात कार्यरत असलेल्या ५५ हून अधिक संस्थांच्या समन्वयातून स्थापन झालेल्या या कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणुकीची तयारी दाखविली आहे. हवाई दलासाठी आवश्यक साधनांच्या निर्मितीसाठी नागपूर व नाशिक येथे प्रकल्प उभारणीसाठी त्यांनी अनुकूलता दाखविल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.