काही महिन्यांपूर्वी पश्चिम रेल्वेवर प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेला आणि महिनाभरातच बासनात गुंडाळलेला बंद दरवाज्यांचा प्रकल्प उपनगरीय रेल्वेमार्गावर पुन्हा एकदा अस्तित्वात येणार आहे. या वेळी दस्तुरखुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या बंद दरवाज्यांची कल्पना पुढे मांडली असून त्या मुळे रेल्वेगाडय़ांतून पडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा त्यांना आहे. प्रत्यक्षात मुंबईच्या उपनगरीय सेवेचा परिचय असलेल्या सुरेश प्रभू यांना मुंबईकर प्रवाशांची नस कळली नसल्याची टीका प्रवासी संघटना आणि प्रवासी करत आहेत. विशेष म्हणजे मुंबईच्याच काही खासदारांचाही या प्रकल्पाला विरोध आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याऐवजी सुरेश प्रभू प्रवाशांच्या समस्यांमध्ये भर टाकत असल्याचे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

यापूर्वीच्या प्रयोगाचे काय झाले?
स्वयंचलित दरवाज्यांचा प्रयोग रेल्वेने पश्चिम रेल्वेवरील एका गाडीच्या महिलाच्या प्रथम श्रेणीच्या एका डब्याच्या एका दरवाज्यापुरता करून बघितला होता. मात्र या प्रयोगाला यश न आल्याने रेल्वेने हा प्रकल्प बासनात गुंडाळला होता. अशा वेळी एक प्रयोग फसल्यानंतर पुन्हा तोच प्रयोग नव्याने करण्याचा प्रकार रेल्वे का करत आहे, हे कोडे आहे. स्वयंचलित दरवाज्यांवर पसे खर्च करण्यापेक्षा रेल्वेने मुंबईतील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
नीता पिटकर (बोरिवली)

दरवाजे बंद होणार का?
लोकलमध्ये बंद दरवाज्यांची प्रणाली बसवण्याचा उपाय सुरक्षेसाठी चांगला असला, तरी तो मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसेवेसाठी अत्यंत अपुरा आणि तुटपुंजा आहे. स्वयंचलित दरवाज्यांच्या प्रणालीत दरवाजे बंद झाल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मेट्रोमध्ये ही प्रणाली असली, तरी मेट्रोच्या प्रवासी संख्येची तुलना रेल्वेच्या प्रवासी संख्येबरोबर करणे योग्य नाही. त्यामुळे लोकल गाडय़ांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवल्यावर गर्दीच्या रेटय़ामुळे ते दरवाजे बंद होतील का, हा मुख्य प्रश्न आहे. ते बंद झाले नाहीत, तर गाडय़ा पुढे जाणारच नाहीत.
सुनील कांबळे, (डोंबिवली)

स्वयंचलित दरवाजे नकोच!
मुंबईसारख्या मोठय़ा शहरात स्वयंचलित दरवाजे ही प्रणाली सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये अत्यंत चुकलेली आहे. स्वयंचलित दरवाज्यांसाठी प्लॅटफॉर्म आणि गाडीचा फुटबोर्ड यांची उंची एकसमान असणे आवश्यक आहे. मुंबईत सध्याच्या स्थितीत ते शक्य नाही. तसेच प्लॅटफॉर्मची उंची तेवढी वाढवणे आणि गाडय़ांमध्ये तशा प्रकारे सुधारणा करणे, हे खूपच वेळखाऊ ठरेल. रेल्वेने या सर्व पायाभूत सुविधा देण्याचा विचार केला नसेल, तर स्वयंचलित दरवाजे नकोच!
हर्षदा जोशी (ठाणे)

खऱ्या प्रश्नांकडे कधी लक्ष देणार?
स्वयंचलित दरवाज्यांसारख्या फसलेल्या प्रकल्पांना चेतना देण्याऐवजी रेल्वेने खऱ्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. दिवा-ठाणे पाचवी-सहावी माíगका, सीएसटी-कुर्ला पाचवी-सहावी माíगका, हे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची गरज आहे. त्यासाठी उपाययोजना करण्यावर रेल्वेने भर दिला पाहिजे. रेल्वेमंत्री मुंबईचे असूनही त्यांना उपनगरीय प्रवाशांच्या समस्यांबाबत संवेदनशीलता नसल्याचे हे द्योतक आहे.
नंदकुमार देशमुख,उपनगरीय प्रवासी एकता संघ

रेल्वेमंत्र्यांची उपाययोजना वरवरचीच!
भावेश नकातेचा जीव गेल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अशा अपघातांबाबत कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर खासदारांच्या बठकीत स्वयंचलित दरवाज्यांसारख्या तकलादू योजना त्यांच्या तोंडावर मारल्या आहेत. पण ही मलमपट्टी वरवरची आहे. रेल्वेने आता केवळ आश्वासनांवर प्रवाशांची बोळवण करण्याऐवजी याआधीच्या अर्थसंकल्पांत केलेल्या घोषणा पूर्णत्वास आणाव्यात. त्याशिवाय लांब पल्ल्याच्या गाडय़ा थेट मुंबईपर्यंत आणण्याऐवजी मुंबईच्या वेशीबाहेर थांबवाव्यात. त्यामुळे उपनगरीय गाडय़ांना मोकळा मार्ग मिळेल.
सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री संघ

स्वयंचलित दरवाजे चांगलेच
स्वयंचलित दरवाज्यांची योजना अपघात रोखण्यासाठी निश्चितच चांगली आहे. भरमसाठ प्रवासी वाहतूक करणे किंवा सुरक्षित प्रवासी वाहतूक करणे, यापकी रेल्वेने सुरक्षित प्रवासी वाहतुकीचा पर्याय निवडला असेल, तर त्यात काहीच चूक नाही. स्वयंचलित दरवाज्यांमुळे प्रत्येक दारावरील आठ म्हणजेच १२ डब्यांच्या गाडीतील ७६८ प्रवासी कमी होतील. पण उर्वरित प्रवाशांचा प्रवास निर्धोक होईल. त्यामुळे रेल्वेच्या या संकल्पनेचे स्वागत करायला हवे.
श्रीकांत सोनावणे,कांदिवली