डॉ. अरूण टिकेकर यांच्या निधनाने पत्रकारितेतील दरारा आणि व्यासंग लोपला असल्याची तसेच अभ्यासू, तत्त्वनिष्ठ व ज्ञानी व्यक्तिमत्त्व हरपले असल्याची भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मंगळवारी दादर येथे व्यक्त केली. डॉ. टिकेकर यांच्या पार्थिवावर विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.   या वेळी प्रकाश कुलकर्णी, राजीव खांडेकर, किरण नाईक, दिलीप चावरे, सुकृत खांडेकर, श्रीकांत बोजेवार यांनीही श्रद्धांजली वाहिली. तसेच या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार-

संपादक राधाकृष्ण नार्वेकर, ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर, ‘पॉप्युलर प्रकाशन’ संस्थेचे रामदास भटकळ, आमदार कपिल पाटील, मॅजेस्टिक बुक डेपोचे अशोक कोठावळे, ज्योत्स्ना प्रकाशनचे विकास परांजपे, ‘शब्द’ प्रकाशनाचे येशू  पाटील, विचारवंत व लेखक सुधींद्र कुलकर्णी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

  • विद्यासागर राव (राज्यपाल) : डॉ. अरुण टिकेकर यांच्या निधनाने थोर विचारवंत आणि पत्रकाराला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांचे विविध विषयांवरील लिखाण समाजासाठी दिशादर्शक आहे.
  • देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)-डॉ. अरुण टिकेकर यांच्या निधनाने व्यासंगी पत्रकार व माहिती आणि संशोधनपर लिखाण करणारा अभ्यासक गमावला आहे.
  • शरद पवार, (ज्येष्ठ नेते) डॉ. अरुण टिकेकर यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक सव्यसाची आणि विचारवंत संपादक मिळाले होते.

‘लोकसत्ता’चे संपादक म्हणून त्यांनी केलेले काम वाचकांची वैचारिक बैठक तयार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली.  लिखाणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव पुढील पिढय़ांमध्येसुद्धा राहील.

  • शरद काळे (‘एशियाटिक सोसायटी’चे अध्यक्ष)- चिंतन आणि प्रबोधन हे त्यांच्या आवडीचे विषय होते. एखाद्या विषयावरील त्यांची मते दोन्ही बाजूंनी विचार करून ते बाजू मांडायचे. ल्लडॉ. संजय देशमुख, कुलगुरू, मुंबई विद्यपीठ- . मुंबई विद्यापीठावर आणि विशेषत: राजाबाई टॉवर ग्रंथालयावर त्यांचे आत्यंतिक प्रेम होते. डॉ. टिकेकर यांचा १९व्या शतकाचा अभ्यास हा अत्यंत सखोल, सप्रमाण आणि तरीही अत्यंत संवेदनशील असा होता.
  • मेघना काळे (चतुरंग प्रतिष्ठान)- टिळक, आगरकर, रानडे यांना आमच्या पिढीने पाहिले नाहीत त्यांच्या फक्त आठवणी आहेत. पण विद्वत्ता, अभ्यास, व्यासंग आणि ज्ञानभांडाराचा प्रचंड साठा असलेले डॉ. टिकेकर आम्ही प्रत्यक्ष पाहिले, त्यांचा सहवास लाभला.
  • प्रदीप जोशी (प्राचार्य चेतना महाविद्यालय)- त्यांच्याकडे जेव्हा कधी मदत मागितली त्या प्रत्येक वेळी कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी आम्हाला मदत केली.
  • प्रा. मीना वैशंपायन (एशियाटिक सोसायटी)- एशियाटिक सोसायटीचे ते माजी अध्यक्ष होते. आम्हा कार्यकर्त्यांना त्यांचा मोठा आधार होता.
  • जयराज साळगावकर (उद्योजक, लेखक)- पत्रकार, संपादक म्हणून ते थोर होतेच पण माणूस म्हणूनही ते खूप मोठे होते. ‘ज्ञानाचा झरा’ अशा एका शब्दात त्यांचे वर्णन करता येईल.
  • सुहास बहुलकर (ज्येष्ठ चित्रकार)- तत्त्वनिष्ठा म्हणजे काय, व्यासंग कसा असावा, लिहावे व बोलावे कसे? हे मी त्यांच्याकडूनच शिकलो. प्रत्येक गोष्टीत त्यांना अचुकतेचा ध्यास होता.
  • राधाकृष्ण विखे-पाटील, (विरोधी पक्षनेते) डॉ. अरुण टिकेकर यांच्या निधनाने एक निर्भीड, निष्पक्ष आणि अभ्यासू विचारवंत हरपला आहे.
  • फ्रान्सिस दिब्रिटो : संशोधक आणि पत्रकारापेक्षा डॉ. अरुण टिकेकर हे संवेदनशील होते व हे त्यांच्या लेखनातून जाणवत असे.
  • सुहास सोनावणे (‘मुंबई’ विषयावरील लेखक)- ‘लोकसत्ता’मध्ये मुंबईविषयक विविध विषयांवरील लेखन करण्याची संधी मला त्यांच्यामुळेच मिळाली.