मानवी मेंदूत भावभावना नेमक्या कशा निर्माण होतात, त्यांच्यातील गुंत्याचा वेध कसा घेतला जातो. त्याचबरोबर नैराश्यावरील औषधांचा परिणाम तत्काळ व्हावा, यासाठीचे मोलाचे संशोधन करून त्याची उपयुक्तता सिद्ध करणाऱ्या वैज्ञानिक डॉ. विदिता वैद्य यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी गुरुवारी (दि. १५) मुंबईत होणाऱ्या लोकसत्ता ‘व्हिवा लाउंज’मधून मिळणार आहे.

केसरी प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’मधून विविध क्षेत्रांत मोलाची कामगिरी करणाऱ्या स्त्रियांची प्रेरणादायी यशोगाथा उलगडण्याचा प्रयत्न असतो. या वेळी व्हिवा लाउंजच्या व्यासपीठावर डॉ. विदिता यांच्या रूपाने प्रथमच विज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संशोधकाला आमंत्रित करण्यात आले आहे. ताणतणाव आणि नैराश्य या आजच्या जीवनशैलीत दिवसेंदिवस मोठय़ा होत जाणाऱ्या विषयांच्या मुळाशी जाणारे संशोधन डॉ. वैद्य यांनी केले आहे. डॉ. वैद्य सध्या मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत कार्यरत आहेत. त्यांनी याविषयी आतापर्यंत केलेल्या संशोधनाचा नैराश्यावरील उपचारांना मोठा फायदा झाला आहे.

विदिता यांच्या संशोधन विषयाबरोबच विज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि करिअर संधी, भारतातील आणि भारताबाहेरील संशोधन अनुभव अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा होणार आहे. कार्यक्रम सर्वासाठी खुला असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश मिळेल.

’कधी : गुरुवार  १५ ऑक्टोबर, संध्या. ४.४५ वा.

’कुठे : स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर.

’प्रवेश विनामूल्य. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.