पर्यावरणप्रेमाचे ढोल वाजवत महानगरपालिकेने सुरू केलेल्या कृत्रिम तलावाचे सगळे मुसळ केरात जात असल्याचे उघड झाले आहे. पीओपी मूर्तीमुळे समुद्रात प्रदूषण होत असल्याने कोटय़ावधी रुपये आणि मनुष्यबळ खर्ची घालून कृत्रिम तलावाचा घाट घालणारी पालिका या तलावातील पीओपीच्या विसर्जित होत नसलेल्या मूर्ती समुद्रातच टाकत आहे. त्यामुळे आता पीओपीच्या मूर्तीवरच बंदी घालण्याची मागणी स्थायी समितीतील सदस्यांनी केली.
दहिसरमधील स्वतच्या मतदारसंघात कृत्रिम तलावांचा प्रयोग यशस्वी केल्यावर माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी महापौर निवासातही कृत्रिम तलावाची योजना प्रत्यक्षात आणली. समुद्रातील प्रदूषण रोखण्यासाठी जागरूक मुंबईकरांनी या योजनेला भरभरून प्रतिसाद दिला आणि दरवर्षी कृत्रिम तलावांची संख्या आणि त्यातील विसर्जित मूर्तीचे प्रमाणही वाढले. यंदा शहरातील २७ तलावात २२ हजारहून अधिक गणपती व गौरींचे विसर्जन करण्यात आले. मात्र विसर्जनानंतर या मूर्तीचे नेमके काय होते, या सामान्य मुंबईकरांच्या मनातील शंकेचे उत्तर देण्यात पालिका अधिकाऱ्यांनी नेहमीच टाळाटाळ केली. या मूर्तीपासून विटा बनवून झाडांच्या भोवटी पार बांधण्याचा उपाय डॉ. राऊळ यांनी सुचवून प्रत्यक्षात आणला होता. मात्र हा उपाय करण्याएवढी इच्छाशक्ती पालिका अधिकाऱ्यांमध्ये नसल्याने कृत्रिम तलावातील सर्व गाळ, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पुन्हा समुद्रातच टाकल्या जात असल्याचा मुद्दा स्थायी समिती सदस्य आणि मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी मांडला. कृत्रिम तलावात विसर्जित केलेल्या पीओपीच्या मुर्तीही विरघळत नाहीत. तलावातील हा गाळ एखाद्या डोंगरावर टाकण्याचा तसेच त्यापासून विटा करण्याचा पर्याय असतानाही पालिका मात्र हा गाळ थेट समुद्रात टाकते, त्यामुळे कोटय़ावधी रुपये खर्च करून पर्यावरणस्नेही उपायांचा फज्जा उडत असल्याचे समोर आले. पीओपी मूर्तीचे विसर्जन हा मुद्दा दिवसेंदिवस त्रासदायक ठरत असून या मूर्तीवर बंदी आणण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेवक व स्थायी समिती सदस्य शीतल म्हात्रे यांनी केली.
कृत्रिम तलावांवर कोटय़वधींचा खर्च
कृत्रिम तलाव करण्यासाठी खणावा लागणारा खड्डा, त्यातील प्लास्टिक कापड, विसर्जनानंतर सतत बदलावे लागणारे पाणी, सुरक्षा रक्षक, विसर्जन करणारी मुले, तलावातील गाळ घेऊन जाण्याचा वाहतूक खर्च इत्यादीसाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च येतो. शहरात व्यवस्था करण्यात आलेल्या २७ कृत्रिम तलावांसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आला.