आशिष शेलार यांचा टोला; वाघ,सिंहावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली
वाघसिंहाच्या उपमेवरून भाजप-शिवसेनेमध्ये जुंपली असून बालबुध्दीमुळे ते टीका करीत असल्याचे प्रतिपादन करीत मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड आशिष शेलार यांनी ‘मुंबई म्हणजे प्राण्यांची सर्कस नाही,’ असे प्रत्युत्तर शिवसेनेला दिले आहे.
वाघांचे दिवस आता संपले असून गल्लीबोळात आता सिंह दिसतील, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केल्यावर शिवसेना नेते संतापले आहेत. घाटकोपर परिसरात आणि ‘सामना’ मुखपत्रातून वाघ सिंहाचा घोट घेत असल्याचे पोस्टर प्रकाशित केले आहे आणि मुंबईत वाघाचीच सत्ता राहील, असे सूचित करण्यात आले आहे. मेहता यांचा उल्लेख ‘माजलेला बोका’ असा करण्यात आला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीनिमित्ताने दोन्ही पक्षांमध्ये जुंपली आहे. ‘मेक इन इंडिया’ च्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार प्रत्येक माणसापर्यंत पोचेल आणि मेक इन इंडियाचे प्रतीक सिंह आहे, हा आशय ठेवून प्रकाश मेहता बोलले आहे. पण बालबुद्धीमुळे अर्थ न कळल्याने टीका केली जात आहे. मुंबईच्या विकासाला मानवी चेहरा असावा, अशी भाजपची भूमिका असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले आहे. शेलार यांनी मुंबईतील नालेसफाईची पालिका व रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर पाहणी केली.