विधान परिषद, जिल्हा परिषद, नगरपालिकांनंतर आता महानरपालिका लक्ष्य; १९ ऑगस्टला मतदार याद्या

विधान परिषद, जिल्हा परिषद, जिल्ह्य़ातील नगरपालिकांमध्ये यश मिळवणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची आता लवकरच होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत कसोटी लागणार आहे. जिल्ह्य़ातील सर्व निवडणुका जिंकणारे अशोकराव महानगरपालिकेची सत्ता कायम राखतात का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

राज्यात काँग्रेसची पार वाताहात झाली असताना अशोक चव्हाण यांनी नांदेडचा गड कायम राखला आहे. नांदेड लोकसभा निवडणुकीत स्वत: निवडून आले. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ात तीन आमदार निवडून आले. गेल्या आठ महिन्यांमध्ये झालेल्या विविध निवडणुकांमध्ये अशोकरावांमुळे काँग्रेसला यश मिळाले. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत साऱ्या विरोधकांनी आव्हान उभे करूनही अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर हे विजयी झाले होते. विधान परिषदेच्या त्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी सारे एकत्र येऊन अशोकरावांचा घाम काढला होता, पण ती जागा कायम राखण्यात अशोकराव यशस्वी झाले होते.

नगरपालिका निवडणुकीत राज्यात अन्यत्र भाजपची सरशी झाली असताना नांदेड जिल्ह्य़ात सर्वाधिक नगरपालिका आणि सर्वाधिक नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून आले. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली नसली तरी काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य निवडून आले होते. जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात राहिली.

मतदार याद्या १९ ऑगस्टला

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची मुदत ही ३० ऑक्टोबरला संपत आहे. पावसाळा आणि सणवारी लक्षात घेऊन महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर केली जाईल. १९ ऑगस्टला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केले जाईल, असे राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी जाहीर केले. १ जुलै रोजी निवडणूक आयोगाने विधानसभानिहाय जाहीर केलेली मतदारयादी त्यासाठी ग्राह्य़ धरली जाईल. १९ ऑगस्टला प्रभारनिहाय मतदारयाद्या जाहीर केल्या जातील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

नांदेड-वाघाळा महानगरपालिका अनेक वर्षे काँग्रेसच्या ताब्यात आहे. यंदा भाजप, शिवसेनेचे काँग्रेसपुढे आव्हान असेल.  माजी मुख्यमंत्री अशोकरावानी जिल्ह्य़ाच्या राजकारणावर चांगला जम बसविला आहे. महानगरपालिका निवडणुकीतही अशोकराव पुरत्या ताकदीने उतरतील. महानगरपालिकेची सत्ता कायम राखणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे आहे. आगामी सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता महानगरपालिकेची सत्ता कायम राखणे हे अशोकरावांसाठी महत्त्वाचे आहे. अशोकराव विरुद्ध सारे असे जिल्ह्य़ात चित्र आहे. प्रत्येक निवडणुकीत अशोकराव बाजी मारतात. महानगरपालिका निवडणुकीतही अशोकराव बाजी मारतात का, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

विधान परिषद, जिल्हा परिषद, जिल्ह्य़ातील नगरपालिकांमध्ये यश मिळवणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची आता लवकरच होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत कसोटी लागणार आहे.

राज्यात काँग्रेसची पार वाताहात झाली असताना अशोक चव्हाण यांनी नांदेडचा गड कायम राखला आहे. नांदेड लोकसभा निवडणुकीत स्वत: निवडून आले. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ात तीन आमदार निवडून आले. गेल्या आठ महिन्यांमध्ये झालेल्या विविध निवडणुकांमध्ये अशोकरावांमुळे काँग्रेसला यश मिळाले. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची मुदत ही ३० ऑक्टोबरला संपत आहे.