‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखवित सत्तेत आलेले भाजप सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरले असून, दिलेली कोणतीच आश्वासने पाळलेली नाहीत. भाजप सरकारचा निषेध करण्याकरिताच सरकारला एक वर्ष पूर्ण होते त्या दिवशी म्हणजेच २६ तारखेला राज्यभर काँग्रेसच्या वतीने ‘अच्छे दिना’ची पहिली पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकारपेक्षा राज्यातील फडणवीस सरकारचा सहा महिन्यांचा कारभार निराशाजनक असल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे.
स्वस्ताई, काळा पैसा परत आणणार व त्यातून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख जमा करणार, वर्षभरात अडीच कोटी नवे रोजगार, पेट्रोल-डिझेल आणि घरगुती वापराचा गॅस स्वस्त करणे, शेतीच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत, औषधे स्वस्त करणार अशी अनेक आश्वासने दिली होती. पण यातील कोणत्याही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी करून, सरकारच्या धोरणाचा निषेध करण्याकरिता राज्यभर प्रतिकात्मक पहिली पुण्यतिथी साजरी केली जाणार असल्याचे सांगितले. या दिवशी राज्यात  मोर्चे, निदर्शने केली जातील. मुंबई काँग्रेसच्या वतीने चौपाटीपासून सरकारच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे. दुष्काळ वा गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांची अवस्था फारच वाईट असल्याने कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांची मुक्तता करावी, अशी मागणी केली.

महाराष्ट्राचा ऱ्हास हाच गुजरातचा विकास !
केंद्रातील मोदी सरकारप्रमाणेच राज्यातील फडणवीस सरकारही सहा महिन्यांत सर्वच आघाडय़ांवर सपशेल अयशस्वी ठरले आहे. गोवंश हत्याबंदीनंतर अल्पसंख्याकांना त्रास देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. नांदेडमध्ये एका मशिदीच्या धर्मगुरूला स्थानिक पोलिसांनी सरकारच्या गोवंश हत्याबंदी विरोधात मोच्र्यात सहभागी होऊ नका व सरकारच्या धोरणाचे समर्थन करा, अशा आशयाचे पत्र पाठविल्याची माहिती दिली. पत्रकार परिषदेत ते पत्रच चव्हाण यांनी सादर केले. प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. एका मंत्र्याच्या हट्टामुळे सात तहसीलदारांना त्यांची कोणतीही चूक नसताना निलंबित करण्यात आले. राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये हलविले जात आहेत. तरीही मुख्यमंत्री मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका चव्हाण यांनी केली. शिवसेना गप्प का, असा सवाल केला. टोल बंद करणे शक्य नव्हते याची आमच्या सरकारला कल्पना होती. म्हणूनच आम्ही तशा घोषणा केल्या नाहीत. टोलमुक्तीचे आश्वासन देणारे आता कोकणासह राज्यात ठिकठिकाणी नव्याने टोल सुरू करण्याच्या करणार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राष्ट्रवादीला डिवचले
काँग्रेसबरोबर आघाडी करण्यास तयारी दर्शविणाऱ्या शरद पवार यांच्या भूमिकेचे स्वागत असले तरी पवारांचे विचार पक्षाची राज्यातील नेतेमंडळी ऐकत नाहीत, असे सांगत अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा डिवचले. बच्चेमंडळींच्या विधानांची दखल घेत नाही, असे प्रत्युत्तर पवार यांनी चव्हाण यांना दिले होते. त्याबाबत प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण यांनी, राष्ट्रवादीची कळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा टोला साहजिकच अजित पवार यांना उद्देशून होता.