अभिनेता विजय पाटकर यांचा आरोप; चित्रपट महामंडळ निवडणूक
‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’च्या निवडणूकीत अभिनेता विभागातून दिग्दर्शक, अभिनेता विजय पाटकर हे निवडून आले आहेत. मात्र मतमोजणीदरम्यान आपल्यावर आणि आपल्या ‘क्रियाशील पॅनेल’च्या सदस्यांवर ‘समर्थ पॅनेल’च्या सदस्यांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोप विजय पाटकर यांनी केला आहे.
‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची’ निवडणूक यावेळी खूपच गाजली. विजय पाटकर हे महामंडळाचे प्रभारी अध्यक्ष आहेत. त्यांनी यावेळी अभिनेता विभागातून निवडणूक लढवली होती. मात्र महामंडळाचा प्रभारी अध्यक्ष असूनही आपल्याला गुंडगिरीच्या अनुभवाला सामोरे जावे लागले, याबद्दल विजय पाटकर यांनी खंत व्यक्त केली. मतमोजणीच्या दिवशी अभिनेता विभागाचा निकाल रात्री १२ वाजता लागला. विजय पाटकर यांनी यासंदर्भात धर्मादाय आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना लेखी तक्रार दिली आहे. त्याची दखल घेण्यात आली असून या प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल, असे आश्वासन पोलीस महासंचालकांनी दिले असल्याची माहितीही पाटकर यांनी दिली. यावेळी पाटकरांसोबत ‘संघर्ष’ पॅनेलचे एस. एम. रंजनही उपस्थित होते. रंजन यांनीही ही निवडणूक पैशाच्या आणि गुंडगिरीच्या जोरावर जिंक ण्यात आली असल्याचा दावा केला. मतमोजणीच्या वेळी महामंडळाच्याच सदस्याला प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते. त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून फेरनिवडणूक घेतली जावी, अशी मागणी रंजन यांनी केली. तर आपल्या सदस्यांनी फे रनिवडणूकीची मागणी केली तरच आपला पाठिंबा असेल, असे पाटकर यांनी स्पष्ट केले.

मी १५ मतांनी विजयी ठरलो तरीही प्रतिस्पर्धी सुशांत शेलार यांनी फेरमतमोजणी करण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडले. फेरमतमोजणीतही विजयी झाल्यानंतर त्यांनी पुन्हा मतपेटय़ा सील करून दुसऱ्या दिवशी सकाळी नव्याने मतमोजणीची मागणी केली. या मागणीला विरोध दर्शवल्यामुळे ‘समर्थ पॅनेल’च्या रणजीत जाधव, रवि गावडे, धनाजी यमकर आणि सुशांत शेलार यांनी लोखंडी रॉड, दारूच्या बाटल्या घेऊन हल्ला केला.
– विजय पाटकर, अभिनेता