महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी शिवसेनेची मदत घ्यायची की इतर पर्यायांची चाचपणी करायची, यासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामध्ये सोमवारी सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. अमित शहा स्वतः सोमवारी दुपारी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये बंद खोली सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत, यावरच या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यातही प्रामुख्याने शिवसेनेसोबत पुन्हा युती करावी का, याच मुद्द्यावर चर्चेचा भर होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यातील मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्यानंतर आत्ता लवकरात लवकर सत्तास्थापन करण्यासाठी नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये हालचालींना वेग आला आहे. राज्यात भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला असून, पक्षाचे १२२ उमेदवार विजयी झाले आहेत. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपला १४५ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. हाच आकडा गाठण्यासाठी रविवारपासूनच पक्षाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक सोमवारी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि महाराष्ट्र प्रभारी ओम माथूर उपस्थित होते. सर्वच आमदारांनी एकमेकांना पेढे भरवून भाजपच्या विजयाचा आनंद व्यक्त केला.