सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षांकडे लाच मागणाऱ्या उपनिबंधक कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. तक्रार करणाऱ्या व्यक्तीला उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयामध्ये त्यांच्या संस्थेची कागदपत्रे घेऊन बोलाविण्यात आले होते. त्यांनी सोबत आणलेली कागदपत्रे अपूर्ण असून त्यांच्या संस्थेची मान्यता रद्द होईल अशी भीती दाखविण्यात आली होती. मान्यता रद्द होऊ नये यासाठी किरण वगळ या अधिकाऱ्यास भेटण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी वगळ यांची भेट घेतली असता त्यांनी त्यांच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली. मार्च २०१३ मध्ये त्यांनी ही मागणी पूर्ण केली. मात्र त्यानंतरही वगळ यांनी  पाच हजार रुपयांची मागणी केली असता    भायखळा येथे शुक्रवारी सापळा रचून त्यांना  रंगेहाथ अटक करण्यात आली.