देशात पुरोगामी राज्य म्हणून लौकिक असलेल्या महाराष्ट्रात दलित व आदिवासींवरील अत्याचारांच्या घटना वाढत असल्याची धक्कादायक आणि चिंताजनक आकडेवारी पुढे आली आहे. राज्यात वर्षभरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये १६३४ दलितांवरील अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली आहे. आधीच्या वर्षांपेक्षा ५४८ घटना वाढल्या आहेत. राज्यातील श्रीमंत राजकारणी आणि समृद्ध जिल्हे म्हणून ओळख असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. त्यात पुणे, परभणी व अहमदनगर जिल्ह्य़ातील अत्याचारांच्या घटनांची आकडेवारी धक्कादायक आहे.
राज्यात सर्वाधिक काळ सत्ता भोगणारा काँग्रेस पक्ष आहे. त्यांच्यासोबत गेल्या १३ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत बरोबरीचा भागीदार आहे. परंतु ज्याला पुरोगामी राज्य म्हटले जाते आणि ज्या राज्यावर फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे सरकार असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजवटीत गेल्या तीन वर्षांत दलितांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पोलीस महासंचालकांच्या कार्यालयांतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार     विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ात दलितांवरील अत्याचाराच्या घटनांची सर्वाधिक नोंद झाली आहे.
राज्यात २०११ मध्ये ११३४ घटनांची नोंद होती. २०१२ मध्ये त्यात थोडी घट झाली. त्या वर्षांत १०८९ घटनांची नोंद आहे. २०१३ मध्ये मात्र १६३४ अत्याचारांच्या घटनांची नोंद झाली आहे. त्यात खून, मारहाण, बलात्कार, सामूहिक बहिष्कार, जातीवाचक, अवमानकारक शिवीगाळ अशा घटनांचा समावेश आहे. जातीवाचक शिवीगाळ व अवमानकारक उद्गार बऱ्याचदा अनावधानाने घडलेल्या घटना असतात. परंतु खून, बलात्कार, बहिष्कार, मारहाण या गंभीर घटना आहेत, असे अप्पर पोलीस महासंचालक व्ही. डी. मिश्रा यांनी सांगितले.
राज्यात गेल्या वर्षभरात पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक १३४ घटनांची नोंद झाली आहे. परभणीत ९५ व नगरमध्ये ९५ दलित अत्याचाराच्या घटनांची नोंद आहे. पवार, विखे, थोरात या श्रीमंत राजघराण्यांचे हे समृद्ध जिल्हे मानले जातात. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर जिल्ह्य़ात ७२ अत्याचारांच्या घटना घडल्या आहेत. शिंदे स्वत: दलित समाजातील आहेत, त्यांच्या जिल्ह्य़ातील या घटना चिंताजनक आहेत. त्याशिवाय मोहिते-पाटील घराण्याचे राजकीय वर्चस्व या जिल्ह्य़ावर आहे. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगली जिल्ह्य़ात त्या तुलनेत दलितांवरील अत्याचारांच्या घटना कमी असल्या तरी त्या वाढत आहेत. या जिल्ह्यात २०११ मध्ये ९, २०१२ मध्ये १८ व २०१३ मध्ये २६ घटनांची नोंद झाली आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्य़ात ६५ घटना घडल्या आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्य़ात वर्षभरात दलितांवरील अत्याचाराच्या ७८ घटनांची नोंद आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मात्र सर्वाधिक कमी म्हणजे फक्त ८ घटनांची नोंद आहे. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या यवतमाळ जिल्ह्य़ात ८८ घटना घडलेल्या आहेत. समता परिषदेचा झेंडा घेऊन निघालेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्य़ात ५५ घटनांची नोंद आहे.
सत्ताधारी राजकीय नेत्यांच्याच जिल्ह्य़ात दलितांवरील अत्याचार वाढत आहेत असे नाही, तर वजनदार विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या जिल्ह्य़ातील घटनाही चिंताजनक आहेत. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या बीड जिल्ह्य़ात ८३ घटनांची नोंद आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव जिल्ह्य़ात दलित अत्याचाराच्या ७८ घटना घडल्या आहेत. आदिवासींवरील अत्याचारातही गेल्या तीन वर्षांत वाढ झाली असून वर्षभरात ४१८ घटनांची नोंद झाली आहे.