दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार याच्यावर रविवारी मुंबई विमानतळावर पुण्याकडे येणाऱ्या विमानामध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात येतो आहे. मानस ज्योती असे कथित हल्लेखोराचे नाव असून, ते सध्या टीसीएसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. कंपनीच्या कामानिमित्त कोलकाताहून मुंबईमार्गे ते पुण्याकडे येत होते. विमानामध्ये कन्हैया आणि मानस ज्योती एकाच रांगेतील सीटवर बसले होते. त्यावेळी मानस ज्योती यांनी आपला गळा दाबल्याचा दाव कन्हैयाने केला. या प्रकरणी पोलिसांकडे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे कन्हैया आणि मानस ज्योती यांना जेट एअरवेजने विमानातून उतरविले. त्यामुळे कन्हैया द्रुतगती मार्गावरून पुण्याकडे येण्यास रवाना झाला आहे.
फक्त लक्ष वेधण्यासाठी कन्हैयाने रचला हल्ल्याचा बनाव, कथित हल्लेखोराचा दावा
मिळालेल्या माहितीनुसार, कन्हैय्याची रविवारी संध्याकाळी पुण्यामध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी रविवारी सकाळी मुंबईहून पुण्याकडे येणार होता. जेट एअरवेजच्या विमानात बसल्यानंतर शेजारील सहप्रवासी मानस ज्योती यांनी आपला गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा दावा कन्हैया कुमारने केला. या घटनेनंतर त्याच्या समर्थकांमध्ये आणि कथित हल्लेखोरामध्ये शाब्दिक चकमक उडाली. विमानातील कर्मचाऱ्यांनी या दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अपयश आल्यामुळे दोघांनाही विमानातून खाली उतरविण्यात आले. या घटनेनंतर कन्हैयाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान, या घटनेमुळे रविवारी सकाळी पुण्यात येणार असलेला कन्हैया कुमार दुपारी मुंबईहून गाडीतून पुण्याकडे येण्यास रवाना झाला. संध्याकाळी पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात त्याची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी रंगमंदिराच्या परिसरात कडेकोट पोलीस सुरक्षा ठेवण्यात आली आहे.