भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तर लंडनमधील निवासस्थानाची नामुष्की संबंधित इमारत ही थेट खरेदी करण्याच्या एका ‘कल्पक’तेने अखेर टळली आहे. सहा महिन्यांपूर्वी लिलावाची पाटी झळकलेल्या किंग हेन्री मार्गावरील १० क्रमांकाच्या या इमारतीच्या खरेदीचे व्यवहार सुरू होणारी प्रक्रिया केवळ महिला उद्योजिकेमुळे थांबलीच नाही तरी ती रोखीने ताब्यात घेण्याच्या शासनाच्या निर्णयाला अवघ्या महिन्याभरात गती मिळाली आहे.
२,०५० चौरस फूट क्षेत्रफळातील इमारतीच्या लिलावाची प्रक्रिया २०१४ च्या मध्याला सुरू झाली. या तीन मजली इमारतीत १९२० व १९२१ मध्ये डॉ. आंबेडकर यांचे उच्च शिक्षणासाठी वास्तव्य होते. येथे राहूनच त्यांनी परिसरातील लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये त्यांनी सहा वर्षांचा अभ्यासक्रम अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत पूर्ण केला. १०, किंग हेन्री रोड, नॉर्थ लंडन असा पत्ता असलेल्या या इमारतीचा लिलाव कमानी टय़ूब्सच्या अध्यक्षा कल्पना सरोज यांच्यामुळे थांबला आहे.
 सरोज यांनी सहा महिन्यांपूर्वी  या निवासस्थानी भेट दिली होती. तेथे या इमारतीच्या लिलावाचा फलक पाहिल्यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणेशी चर्चा केली. जुलै २०१४ मध्येच महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांबरोबर पत्रव्यवहार केले. मात्र याबाबत केंद्र सरकारच्या संपर्कात असलेल्या महाराष्ट्र शासनाची पावले अत्यंत धीम्या गतीने पडत होती. अखेर ही बाब नवनियुक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही लक्षात आणून देण्यासाठी सरोज यांनी ३१ डिसेंबर २०१४ ्नरोजी पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली .
याबाबत सरोज यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, बाबासाहेबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या जागेचा लिलाव होत असताना भारतातील सरकारला त्याबाबत काहीही माहिती नव्हते. लिलावात अन्य कुणाला तरी ही जागा जाण्यापेक्षा हे ठिकाण आपल्या सरकारने खरेदी करून त्याचे विद्यार्थ्यांसाठीचे आतरराष्ट्रीय शिक्षण केंद्र बनवावे, असा विचार आमच्या चर्चेतून पुढे आला.
आता राज्य शासन ही इमारत थेट ३५ कोटी रुपयांना खरेदी करणार असून तेथे येत्या १४ एप्रिल रोजी हे निवासस्थान आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर व्यवहाराला गती
‘लोकसत्ता’च्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित  कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच्या चर्चेत कल्पना सरोज हा विषय पुन्हा काढला. केंद्र सरकारने राज्याला कळविले असून इमारत खरेदीची प्रक्रिया सुरू होत असल्याचे त्यांनी सरोज यांना सांगितले. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत राज्याच्या समाजकल्याण विभागाने ब्रिटनमधील उच्चायुक्त कार्यालयाशी थेट संपर्क साधून लिलाव प्रक्रिया थांबवून इमारत खरेदी करण्याची उत्सुकता दाखविली. राज्याचे शिक्षणमंत्री लंडनच्या दौऱ्यावर असतानाच या प्रक्रियेला अधिक गती मिळाली.