महाराष्ट्र भूषण, आता पद्मभूषण आणि अन्य कोणत्याही पुरस्कारांपेक्षा माझ्या कवितेवर प्रेम करणाऱ्या रसिकांची दाद आणि टाळी मला अधिक मोलाची वाटते, अशी भावना ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी येथे व्यक्त केली.
दायित्व फाऊंडेशनतर्फे माटुंगा येथील ‘म्हैसूर असोसिएशन’च्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘भाजप’चे नेते व खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
पाडगावकर यांनी या वेळी ‘या जन्मावर या जण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘यांच असं होतं कळत नाही’, ‘गाय जवळ घेते नी वासरू लुचू लागतं’, ‘दार उघड, चिऊताई’ आणि ‘शेपटी’ या कविता सादर केल्या.
या वेळी मुंडे म्हणाले की, पाडगावकर यांना ‘पद्मभूषण’ मिळाल्याने या पुरस्कारालाच सन्मान आणि प्रतिष्ठा लाभली आहे. पाडगावकर म्हणजे मराठी साहित्याला पडलेले सुंदर स्वप्न असून सरस्वती देवी त्यांच्यावर  प्रसन्न आहे.
 राजश्री शिरवाडकर यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी केले. या कार्यक्रमाअगोदर पाडगावकर यांच्या गाण्यांचा ‘शतदा प्रेम करावे’ हा कार्यक्रम निनाद आजगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला.