‘अपून के नोट में साला केमिकल लोचा है.. उसमें दिए गांधीजी की तस्वीर का मोबाइल में फोटो लिया तो तिरंगा बनता है.. और..’
‘अरे भाई मेरे मोबाइल में तो गांधीजी चलनेही लगते हैं..’
असे मुन्नाभाई स्टाइल संवाद सध्या तरुणाईमध्ये घडत आहेत. गांधी जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. याच जोडीला यंदा मोबाइवरही विविध शक्कल लढवून गांधी जयंती साजरी केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर समाजमाध्यमांवरही गांधीजींचे विविध संदेश पोहोचवणारे व्हिडीओज अपलोड होऊ लागले आहेत.
‘ऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटी’ या तंत्रज्ञानाचा वापर करून यंदा गांधीजी मोबाइलवर अवतरणार आहेत. ब्लिपर या ‘ऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटी’ तंत्रज्ञान पुरविणाऱ्या कंपनीने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अ‍ॅपमध्ये खास  उपलब्ध करून दिल्या आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण आपल्याकडील नोटेवरील गांधीजींचा फोटो अ‍ॅप सुरू केल्यावर खुल्या होणाऱ्या कॅमेरामध्ये सेट केला की तो स्कॅन केला जाईल. हे स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये तिरंगा झळकतो आणि त्यावर गांधीजींचे छायाचित्र येते. याचबरोबर तुमच्यासमोर ‘देणगी द्या..’, ‘बी गांधी फॉर द डे’ आणि ‘खेळा आणि जिंका’ असे तीन पर्याय येतात. यात पहिल्या पर्यायाचा वापर करून तुम्ही काही रक्कम देणगी म्हणून देऊ शकता. ही देणगी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मदत निधीमध्ये जमा केली जाते. तर दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही गांधीजींचा चष्मा घातलेला तुमचा सेल्फी घेऊ शकता. जो सेल्फी दिवसभर तुमच्या समाजमाध्यमांवरील खात्यावर तुम्ही ठेवू शकता. तर तिसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला गांधींजींचे छायाचित्र रचायचे असते. जे तुम्ही रचल्यावर तुम्हाला खादी उत्पादनांचे बक्षीस मिळवता येणार आहे.
याशिवाय या कंपनीने ‘टिंकल’ हे नियतकालिक आणि कॅमलिनसोबत सहकार्य करून गांधीजींचे टिंबाचे एक छायाचित्र तयार केले आहे. हे छायाचित्र तुम्ही ब्लिपरच्या अ‍ॅपमधून तुमच्या मोबाइलमध्ये स्कॅन करून घेतले की तुम्हाला तेथे एक पेन्सिल दिसेल. या पेन्सिलच्या साह्य़ाने तुम्हाला टिंब जोडून गांधीजींचे चित्र पूर्ण करावयाचे आहे. हे चित्र पूर्ण झाले की मोबाइलवरील गांधींजींचे छायाचित्र चालू लागते. गांधीजींच्या दांडी यात्रेचे स्मरण म्हणून हा प्रयोग करण्यात आल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. तर महात्मा गांधी आणि त्यांचे विचार हे सतत तरुणाईच्या स्मरणात राहावे यासाठी गांधी जयंतीच्या निमित्ताने हा प्रयोग करण्यात आल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्णव घोश यांनी स्पष्ट केले.