* ऑस्ट्रेलियाची सहाव्यांदा विश्वचषकाला गवसणी  
* अंतिम फेरीत वेस्ट इंडिजवर ११४ धावांनी विजय
‘विश्वचषक आमचाच’ असा डंका पिटत ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला खरा.. पण यावरचं विजिगीषुवृत्तीचा ऑस्ट्रेलियाचा संघ थांबला नाही.. तर आपल्या अद्भुत, अप्रतिम, दर्जेदार आणि लौकिकाला साजेशा कामगिरीच्या जोरावर विश्वचषकात ‘ताईगिरी’ गाजवत त्यांनी सहाव्या विश्वविजयाचे स्वप्न सत्यात उतरवले.. विश्वविजयाची चव ऑस्ट्रेलियाला नवी नसली तरी प्रत्येक वेळी ते नव्या उमेदीने, आशेने, अपेक्षेने, तडफेने, जिंकण्याच्या ईर्षेने मैदानात उतरतात आणि त्याचेच गोड फळ त्यांना या वर्षीही मिळाले. ‘सुपर-सिक्स’मध्ये वेस्ट इंडिजकडून पराभूत होऊन त्यांनी इंग्लंड आणि न्यूझीलंडला स्पर्धेबाहेर काढत चाणाक्ष चाल खेळली, तर त्याच वेस्ट इंडिजचा अंतिम फेरीत तब्बल ११४ धावांनी पराभव करत विश्वचषकाला गवसणी घातली. पहिल्यांदा फलंदाजी करताना सामनावीर जेस कॅमेरून आणि राचेल हायेन्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील २५९ ही सर्वाधिक धावसंख्या उभारली.
भेदक गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा १४५ धावांत फडशा पाडत विश्वचषकातील सर्वात मोठय़ा फरकाने विश्वचषकावर आपले नाव कोरले. ७५ धावांची खेळी साकारणाऱ्या कॅमेरूनला या वेळी सामन्यातील सर्वोत्तम क्रिकेपटूचा, तर न्यूझीलंडची कर्णधार सुझी बेट्सला स्पर्धेत ४०७ धावा केल्याबद्दल मालिकेतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला.
२६० धावांचे आव्हान घेऊन वेस्ट इंडिजचा संघ मैदानात उतरला, पण ऑस्ट्रेलियाने राखून ठेवलेल्या इलिस पेरी या ‘ट्रम्प कार्ड’ने त्यांच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांना बाद करत धक्का दिला, तर लिसा स्थळेकरने मधल्या फळीला दुहेरी धक्का देत संघाला विजयपथ दाखवला. तिखट माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला १४५ धावांत निकामी केले.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या फलंदाजांनी विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील सर्वाधिक धावसंख्या रचत हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. मेग लॅनिंग (३१) आणि राचेल हायेन्स यांनी तडफदार ५२ धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात करून दिली. लॅनिंग बाद झाल्यानंतर हायेन्स आणि जेस कॅमेरून या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी रचत संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला.
हायेन्सने ५२ धावा फटकावल्या तर  ‘लाँग ऑफ’ला षटकार खेचत अर्धशतक झळकावणाऱ्या हायेन्सने ७ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ७५ धावांची सर्वाधिक खेळी साकारली. या दोघी बाद झाल्यावर चांगली सुरुवात होऊनही ऑस्ट्रेलियाची ४४ व्या षटकांत ७ बाद २०९ अशी धावसंख्या होती. अखेरच्या सहा षटकांत जोडी फिल्ड्स (नाबाद ३६) आणि इलिस पेरी (नाबाद २५) यांनी ५० धावा काढत संघाला २५९ धावा उभारून दिल्या. शकुना क्विटिनीने भेदक मारा करत २७ धावांत ३ बळी मिळवले, तर किशोना नाइटने अप्रतिम तीन झेल टिपले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ७ बाद २५९ (जेस कॅमेरून ७५, राचेल हायेन्स ५२; शकुना क्विटिनी ३/२७) विजयी वि. वेस्ट इंडिज : ४३.१ षटकांत सर्व बाद १४५ (मेरिसा अ‍ॅक्वेलेरिया २३ ; इलिस पेरी ३/१९, लिसा स्थळेकर २/२०)
सामनावीर : जेस कॅमेरून
मालिकावीर : सुझी बेट्स.
      आमच्यासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. आमचा संघ एकसंधपणे संपूर्ण स्पर्धेत खेळला. ‘सुपर-सिक्स’मधील पराभवाने निराश झालो होतो, पण आज आम्ही लौकिकाला साजेसा खेळ करत विश्वचषकाला गवसणी घातली. ट्वेन्टी-२० विश्वचषक विजयानंतर मिळालेल्या या विजयाने एक इतिहास आम्ही रचला आहे. फलंदाजांनी २५९ धावा करत विजयाचा पाया रचला तर गोलंदाजांनी चांगला मारा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
जॉडी फिल्ड्स, ऑस्ट्रेलियाची कर्णधार.

टिट-बिट्स
शाळकरी मुलांनी केली जिवाची मुंबई<br />महिला विश्वचषकाला आतापर्यंत चांगला प्रतिसाद लाभलेला नव्हता. पण अंतिम फेरी रविवारी असल्याने बरीच शाळकरी मुलं सामना पाहायला आली होती. ब्रेबॉर्न स्टेडियमवर जवळपास साडेतीन हजार प्रेक्षक उपस्थित होते, त्यापैकी ८० टक्के शाळकरी मुलं होती. भारत अंतिम फेरीत नसल्याने त्यांना सामन्यात जास्त रस नव्हता, पण त्यांनी जिवाची मुंबई केली. मराठमोळ्या घोषणा देत त्यांनी स्टेडियम दणाणून सोडले होते.

कॅम्पबेलचा गंगम डान्स
पाच वेळा विश्वचषक जिंकलेला ऑस्ट्रेलियाचा या वर्षीचा संघही दादाच होता, पण तरीही साऱ्यांचे लक्ष होते ते अनुभवी आणि माजी कर्णधार लिसा स्थळेकरवर. लिसा ऑस्ट्रेलियाचा कणा समजली जाते. १२ धावांवर असताना ‘स्क्वेअर लेग’ला फटका मारताना तिचा झेल शेमेन कॅम्पबेलने अप्रतिमरीत्या टिपला आणि त्यानंतर ‘गंगम’ स्टाइलमध्ये नाच करत तिने आपला आनंद साजरा केला.

वेस्ट इंडिजला जबरदस्त प्रतिसाद
वेस्ट इंडिजचा संघ पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचल्याने त्यांच्या देशात जल्लोष करण्यात आला. त्याचबरोबर बरीच मंडळी वेस्ट इंडिजहून खास सामना पाहण्यासाठी ब्रेबॉर्न स्टेडियमवर हजर होती. त्याचबरोबर बहुतांशी सामान्य मुंबईकर चाहतेही वेस्ट इंडिज संघालाच पाठिंबा देत होते.

ऑस्ट्रेलियाचे दमदार
‘टीम स्पिरिट’
देहबोली आणि टीम स्पिरिट यामधून ऑस्ट्रेलियाने आपणच जेते आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षणाला येताना त्यांचा संघ एकत्रित मैदानात आला. त्याचबरोबर प्रत्येक चेंडूगणिक खेळाडू एकमेकांचा उत्साह वाढवत होते. वेस्ट इंडिजच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचे टीम स्पिरिट दमदार होते.