संतसूर्य तुकाराम व लोकसखा ज्ञानेश्वर या कादंबऱ्यांवरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद साहित्यविश्वात उमटले आहेत. न्यायालयाच्या निर्णयावर सावध प्रतिक्रिया व्यक्त होत असली तरी पुस्तक वा लेखकावर बंदी घातली जाऊ नये असाच सूर उमटताना दिसत आहे.
पुस्तकाच्या वादाबाबत ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी न्यायालयाच्या निकालावर भाष्य अथवा टिप्पणी करण्यास नकार देतानाच कोणत्याही लेखनावर समाज, समाजातील काही विशिष्ट संस्था, संघटना, व्यक्ती किंवा न्याययंत्रणेकडूनही बंदी आणली जाऊ नये, असे आपले व्यक्तिगत मत असल्याचे स्पष्ट केले. लेखक काही विशिष्ट भूमिकेतून लिहीत असतो. ती मते पटत नसतील तर न पटणाऱ्यांनी त्याचा प्रतिवाद करावा. मात्र कोणत्याही प्रकारे त्या पुस्तकावर किंवा लेखकावर बंदी घातली जाऊ नये, असेही ते म्हणाले. तर ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला पाहिजे असे नमूद करत उपरोक्त दोन्ही पुस्तके वाचली नसल्याने त्यात नेमके काय आक्षेपार्ह आहे किंवा नाही त्याबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नसल्याचे स्पष्ट केले. पण लेखकाचे स्वातंत्र्य कोणत्याही प्रकारे धोक्यात येऊ नये, असे आपल्याला वाटते व अशा प्रकरणात लेखक व प्रकाशकांनाही दाद मागण्याचा अधिकार आपण मान्य केला पाहिजे, असे मत नोंदवले.