जय भगवान महासंघ व स्वाभिमान संघटनेचा निर्णय; १ सप्टेंबरला ओला-उबरबाबत निर्णयाचे आश्वासन

उबर-ओला या अ‍ॅपआधारित खासगी टॅक्सी समन्वयक कंपन्यांविरोधात जय भगवान महासंघ आणि स्वाभिमान या दोन्ही संघटनांनी २९ ऑगस्टपासून पुकारलेला बेमुदत संप रविवारी मागे घेण्यात आला. या कंपन्यांना सरकारच्या नियमावलीत आणण्यासंबंधी ठोस निर्णय १ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल, असे आश्वासन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिल्यानंतर दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संपाचा निर्णय मागे घेतला.

या निर्णयामुळे आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना होणारा त्रास वाचणार आहे. पण ३१ ऑगस्ट रोजी मुंबई ऑटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनने संपाची हाक कायम ठेवली आहे.

उबर आणि ओला या खासगी टॅक्सी समन्वयक कंपन्यांच्या आगमनानंतर आपल्या अरेरावी आणि बेमुर्वतखोर स्वभावामुळे नेहमीच टीकेचे धनी ठरलेल्या रिक्षा-टॅक्सीचालकांचे धाबे दणाणले होते. त्यानंतर रिक्षा-टॅक्सी चालकांप्रमाणेच या कंपन्यांनाही सरकारी नियमांच्या चौकटीत बसवण्याची मागणी रिक्षा-टॅक्सी संघटनांतर्फे वेळोवेळी केली जाऊ लागली. त्यासाठी जून महिन्यात जय भगवान महासंघ, स्वाभिमान या संघटनांनी एकेकदा संप केला होता. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही परिस्थितीत काहीच बदल न झाल्याने गेल्या आठवडय़ात जय भगवान महासंघ, स्वाभिमान आणि मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियन या तीनही संघटनांनी वेगवेगळ्या संपाची हाक दिली. त्यापैकी पहिल्या दोन संघटनांनी आपला संप २९ ऑगस्ट रोजी जाहीर केला, तर मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने ३१ ऑगस्ट रोजी संप करण्याचा इशारा दिला.

या पाश्र्वभूमीवर रविवारी परिवहनमंत्री दिवाकर रावते, परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम आणि या संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली.

या बैठकीनंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी संबंधित संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा केली. ओला-उबर आदी कंपन्यांबाबतचे निश्चित धोरण १ सप्टेंबर रोजी जाहीर होईल. त्याबाबत रिक्षा-टॅक्सीचालकांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आम्ही संप मागे घेतल्याचे स्वाभिमान संघटनेचे के. के. तिवारी यांनी सांगितले.

तर आता आम्ही एकदा मुख्यमंत्री आणि एकदा परिवहनमंत्री यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवला आहे, योग्य निर्णय न झाल्यास पुढील निर्णय घेऊ, असे जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सांगितले.

३१ ऑगस्टचा संप कायम!

या दोन संघटनांनी संप मागे घेतला असला तरी ३१ ऑगस्ट रोजी मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने पुकारलेला संप कायम राहणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी जाहीर केले.

..तर पुन्हा संप-सानप

१ सप्टेंबर रोजी निर्णय झाला नाही, तर गणेशोत्सव वगैरेचा विचार करून संपाबाबत निर्णय घेतला जाईल, असे जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सांगितले.