पुस्तकाच्या ४० हजार प्रती शासकीय गोदामात पडून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके आणि पुतळ्यांचा गाजावाजा केला जात असताना धर्मव्यवस्था व जातिव्यवस्थेची मूलभूत व परखड चिकित्सा करणारे त्यांचे विचार मात्र बंदिस्त करून ठेवले गेले आहेत. डॉ. आंबेडकर लिखित ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ या एके काळी गाजलेल्या व वादळी ठरलेल्या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी भाषांतराच्या ४० हजार प्रती सध्या विक्रीविना शासकीय गोदामात धूळ खात पडल्या आहेत. राज्य शासनाकडून त्याचे रीतसर प्रकाशनही केले जात नाही किंवा विक्रीसाठीही परवानगी दिली जात नाही.

राज्य सरकारने १९७८ मध्ये डॉ. आंबेडकरांचे सर्व साहित्य प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षताखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या वतीने आतापर्यंत आंबेडकरांच्या भाषणांचे व लेखनांचे २२ खंड प्रकाशित करण्यात आले. आणखी जवळपास ३० खंड प्रकाशित होतील एवढी कागदपत्रे व साधने उपलब्ध आहेत. त्याचेही संकलन करण्याचे काम समितीच्या वतीने सुरू आहे. प्रकाशित झालेल्यांपैकी २० खंड इंग्रजी भाषेत आहेत. त्यालाही प्रचंड मागणी आहे. गेल्या ३५ वर्षांत लेखन व भाषणे खंडाच्या २ लाख ५० हजार प्रतींची विक्री झाली असून त्यातून सुमारे ९० कोटी रुपयांचे उत्पन्न राज्य शासनाला मिळाले आहे.

राज्य सरकारने या पुस्तकाच्या निर्मितीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याचे स्वतंत्रपणे पुनर्मुद्रण करण्याचे ठरविले. त्यानुसार २०१३ मध्ये ‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ या इंग्रजी पुस्तकाच्या सुमारे दहा हजार प्रती छापल्या व त्या हातोहात विकल्या गेल्या. डॉ. आंबेडकरांचे विचार घराघरात पोहोचावेत, यासाठी जातिव्यवस्थेचे निर्मूलन या नावाने हे पुस्तक मराठी भाषेत प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शासकीय मुद्रणालयाला ५० हजार प्रती छापण्याचे काम देण्यात आले. त्यापैकी वर्षभरापूर्वी ४० हजार प्रती छापून तयार करण्यात आल्या. त्याचे रीतसर प्रकाशन करण्याचे ठरले. परंतु प्रकाशनही नाही आणि विक्रीही नाही, त्यामुळे आंबेडकरांचे मौलिक विचारधन असलेली ही पुस्तके शासकीय गोदामात धूळ खात पडली आहेत.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांचे सर्वच साहित्य प्रकाशित करायचे आहे. ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ या पुस्तकाचेही लवकरच प्रकाशन केले जाईल.
– विनोद तावडे, उच्च शिक्षणमंत्री

पुस्तकाची निर्मिती अशी झाली..

’१९३६ मध्ये लाहोर येथील जात-पात तोडक मंडळाचे अधिवेशन होणार होते. त्यासाठी अध्यक्ष म्हणून आंबेडकरांना निमंत्रित करण्यात आले होते.

’त्यानुसार त्यांनी लिखित स्वरूपात अध्यक्षीय भाषण तयार केले व ते संयोजकांकडे पाठविले.

’त्यात हिंदू धर्म व जातिव्यवस्थेची केलेली परखड चिकित्सा पाहून आयोजकच हादरून गेले.

’शेवटी अधिवेशन व आंबेडकरांचे भाषणही झाले नाही. तेच भाषण पुढे पुस्तकरूपात प्रकाशित करण्यात आले.

’हे पुस्तक म्हणजेच आंबेडकरांनी लिहिलेला भारतातील जातिअंताचा जाहीरनामा मानला जातो.