जे. जे. रुग्णालयात उबदार काचपेटीतील ‘शॉर्ट सर्किट’मुळे होरपळलेल्या बालिकेचे गुरुवारी सकाळी निधन झाले. अवयव निकामी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.

२१ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या बालिकेला त्याच दिवशी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. पूर्ण दिवस भरण्याच्या दीड महिना आधी जन्मलेल्या या मुलीचे पोषण अपुरे झाले होते. त्यामुळे तिला कावीळ व श्वसनविकार झाला होता. तिला नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील उबदार पेटीत ठेवण्यात आले. मात्र शनिवारी संध्याकाळी या यंत्रात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे यंत्र अधिक गरम झाले व त्यात मुलीची पाठ भाजली. ती २० टक्के भाजली होती. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने बालिकेवर उपचार सुरू केले. गेले दोन दिवस तिची स्थिती खालावली होती. भाजलेल्या जखमांना संसर्ग झाला होता. त्यामुळे तिला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले. गुरुवारी, १० डिसेंबर रोजी सकाळी तिचे निधन झाले. कोलकातामध्येही २५ नोव्हेंबर रोजी उबदार काचपेटीत ठेवलेल्या दोन नवजात शिशूंचा मृत्यू झाला होता.