मोठा मुलगा गिरीशने आत्महत्येची धमकी दिल्यामुळे आपण लवकरच अमली पदार्थाच्या तस्करीतून बाहेर पडणार होतो, अशी माहिती शशिकला ऊर्फ बेबी पाटणकर या अमली पदार्थाच्या तस्कर महिलेने पोलिसांना दिली आहे. २००१ पासून आपल्यावर कुठलेही गुन्हे नव्हते. परंतु वरळी आणि वसई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर आपण त्यात पुन्हा अडकत गेलो, असेही तिने सांगितले.
तब्बल ४० दिवस मागावर असलेल्या मुंबई पोलिसांना कुडाळमधील एका सामाजिक कार्यकर्त्यांने बेबीची माहिती दिली. बेबीच्या माहितीची शहानिशा आजाद मैदान येथे आलेल्या कोकणातील काही मंडळींच्या मोर्चानंतर झाल्याचेही बोलले जाते. या मोर्चेकऱ्यांनी छायाचित्रातील बेबीला ओळखले आणि ती गावात कुठे उतरली आहे हेही सांगितले. त्यानंतर पोलिसांचे पथक कुडाळलाही काही दिवस ठाण मांडून होते. त्यातूनच बेबीची अधिक माहिती गोळा करता करता तिचा ठावठिकाणा कळल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले. आपल्याला अटक होऊ नये यासाठी बेबीने काही राजकीय मंडळींनाही साकडे घातले होते, तसेच पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला होता. अशा स्थितीतही ती तीन वेळा मुंबईत येऊन गेल्याचे सांगितले जाते. याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
बेबीची दोन्ही मुले अमली पदार्थाच्या तस्करीत असली तरी त्यापैकी गिरीश हा नेहमी तिच्या मागे लागत असे. परंतु वरळी पोलीस ठाण्यात मुलगा आणि सुनेवर एमडी अमली पदार्थ बाळगल्याचा गुन्हा दाखल झाला आणि त्यात बेबीला फरारी दाखविण्यात आले. त्यानंतर वसईतही गुन्हा दाखल झाला. बडतर्फ पोलीस शिपाई धर्मराज काळोखे याच्यासोबतही तिचे संबंध दुरावत चालले होते. त्यामुळे तोही तिच्या मागे हात धुवून लागला होता. त्यामुळेच काळोखेकडे ठेवण्यासाठी दिलेल्या अमली पदार्थाच्या साठय़ाची खबर बेबीने दिली आणि या जाळ्यात  अडकली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.