नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ातही स्वेटर विक्रीला ‘थंड’ प्रतिसाद
बाजारातील मंदीमुळे आधीच डोक्याला हात लावून बसलेल्या स्वेटर विक्रेत्यांना थंडीच्या दडीमुळे ‘हुडहुडी’ भरण्याची वेळ ओढावली आहे. नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा उजडूनही थंडींचा प्रभाव म्हणावा तसा जाणवत नसल्याने त्याचा फटका स्वेटर विक्रेत्यांना बसत असून आतापर्यंत २० टक्केसुद्धा स्वेटरची विक्री झाली नसल्याने विक्रेत्यांची चिंता वाढली आहे. त्यात गेल्या काही वर्षांपासून ग्राहकांचा ओढा जॅकेट्स खरेदी असल्याने हाताने विणलेल्या पारंपरिक स्वेटरचे अस्तित्व धोक्यात आल्याचे निरीक्षण व्यापारी नोंदवत आहेत.
शहरात दरवर्षी थंडीची चाहूल लागताच फोर्ट, दादर, परळ, वांद्रे, मालाड, घाटकोपर आदी भागांत स्वेटर, कानटोपी, मफलर, हातमोजे अशा उबदार कपडय़ांची विक्री करणारे स्टॉल चौकाचौकांत उभे राहतात. यात नियमित स्वेटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसोबत काही हौशी मंडळी बदलत्या ट्रेंडनुसार आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशे असे स्वेटर खरेदी करण्यासाठी मॉलपासून ते अगदी रोडपर्यंत चक्कर मारत असतात. अशा ठिकाणी या स्वेटर विक्रीची उलाढाल सुमारे पाच ते सात कोटींच्या घरात जात असते. यात १५० रुपयांच्या साध्या कानटोपीपासून दोन ते अडीच हजार रुपयांच्या स्वेटरचा समावेश असतो.
सध्या वातारणात कमालीचे बदल होत असल्याने थंडीचा जोर कमी होत चालला आहे. दरवर्षी थंडीच्या दोन आठवडय़ांपूर्वीच स्वेटर विक्रेते बाजाराचा ताबा घेत असे. यंदा मात्र मंदी आणि त्यात थंडीचा जोर कमी जाणवत असल्याने त्याचा एकत्रित परिणाम व्यवसायावर बसत आहे. दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात किमान पाच ते सात लाखांच्या स्वेटरची विक्री होत होती. यावर्षी २० टक्केसुद्धा विक्री झाली नसल्याने चिंता वाढली असल्याचे मालाडचे विख्यात व्यापारी रमेश पटेल यांनी सांगितले. तर दुसरीकडे तरुणमंडळींचा हाताने विणलेल्या पारंपरिक स्वेटरपेक्षा जॅकेट्सच्या खरेदीकडे कल वाढत असल्याचे पटेल यांनी सांगितले.
स्ट्रीट मार्केटमध्ये साधारणपणे स्वेटरची किंमत ३५० रुपयांपासून सुरू होऊन १२०० रुपयांपर्यंत जाते. पण तिथेच जॅकेटची किंमत २५० रुपयांपासून सुरू होते. याशिवाय जॅकेट इतर ऋतूतही वापरता येते. त्यामुळे आपण जॅकेट्सची खरेदी करत असल्याचे ठाकूर महाविद्यालयात शिकत असलेल्या स्वप्निल खोत या तरुणाने सांगितले.
तिबेटी स्वेटर विक्रेतेही चिंतेत
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात तिबेटी कुटुंबे शहरात दाखल झाली आहेत. पारंपरिक स्वेटर, विविध शालींचे प्रकार, मफलर, कानटोपी, हातमोजे आदींच्या जोरावर ग्राहकांना आकर्षति करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र कडाक्याच्या थंडीचे आगमन अद्याप झाले नसल्याने त्यांचीही चिंता वाढली आहे. शहरात राहण्याचा वाढता खर्च आणि स्वेटर विक्रीला मिळणारा अल्प प्रतिसाद, यामुळे तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे मालाडच्या रस्त्यावर स्वेटर विक्री करणाऱ्या शेरसिंग यांनी सांगितले.