‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’च्या व्यासपीठावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेलसारख्या इंधनावरील स्वस्त, प्रदूषणमुक्त, रोजगार निर्मितीक्षम आणि स्वदेशी उपाय वापरून येत्या काही वर्षांत देशाचे वाहतूक क्षेत्र स्वयंपूर्ण व कृषीप्रधान बनविण्याचा भविष्यवेधी आराखडा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकसत्ता’च्या मंचावरून देशासमोर मांडला. मिथेन वायूवर धावणाऱ्या आणि सुखी आणि स्वस्त प्रवासाचा अनोखा अनुभव देणाऱ्या एक हजार आलिशान बसगाडय़ा लवकरच मुंबईत धावताना  दिसतील, अशी दिलासादायक घोषणाही गडकरी यांनी केली. व्होल्वोच्या माध्यमातून मुंबई-पुण्यात वाहतुकीचा हा स्वस्त पर्याय साकारू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वीज, इथेनॉल, मिथेन वायूसह संपूर्ण स्वदेशी पर्यायाचा विचार केल्यास काही लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचू शकते. तसेच ग्रामीण भागातील शेतकरी व अर्थव्यवस्था भक्कम होऊ शकते. मिथेन, इथेनॉल, बायोडिझेलसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर भविष्यात वाढविण्यावर सरकारचा भर राहणार असून सामान्य माणसासही आलिशान प्रवासाचा अनुभव स्वस्तात मिळावा अशी आपली इच्छा आहे, असे गडकरी म्हणाले.

ऊर्जेचा विचार करताना पेट्रोल-डिझेलच्या पर्यायांचा विचार होणे आवश्यक आहे. आपल्या देशात बांबू तसेच तांदळाच्या तूस आणि कुटारापासून इथेनॉल तयार होऊ शकते. राज्याच्या ग्रामीण भागात बांबूंच्या उत्पादनापासून मोठय़ा प्रमाणात इथेनॉल तयार होऊ शकते. त्याचा पर्यायी इंधन म्हणून वाहनांमध्ये वापर केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम होऊन शेतकरी समृद्ध तर होईलच, शिवाय आयात इंधनासाठी मोजाव्या लागणाऱ्या काही लाख कोटी रुपयांचीही बचत होईल, असेही गडकरी यांनी सांगितले. जवळपास पंधरा ते वीस लाख ग्रामीण तरुणांना यातून रोजगार मिळू शकतो. एवढेच नव्हे तर इंधन आयातीची गरजही राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नागपूरमध्ये इथेनॉलवर सध्या ५५ बसेस धावत असून मुंबईसाठीही योजना तयार आहे. सध्या पेट्रोलचा भाव ७५ रुपये लिटर तर डिझेलचा भाव ६५ रुपये लिटर असून मिथेन वायूवर अथवा विजेवर आधारित व्होल्वो बसेस चालविल्यास जवळपास तीस टक्के भाडे कमी होऊ शकते. ब्राझिल, स्वीत्र्झलड आदी देशांत पर्यायी इंधनावर खूप संशोधन झाले असून त्याचा परिणामकारक वापरही होत आहे. स्वीत्र्झलडमध्ये भाताच्या तणापासून इथेनॉल तयार केले जाते. आपल्याकडेही त्याचा वापर केल्यास शेतक ऱ्याला खऱ्या अर्थाने आर्थिक ताकद मिळेल. आपण परदेशातून ४० हजार कोटी रुपयांचे लाकूड आयात करतो, परंतु आपल्याकडे वन खात्याचे अनेक कायदे असे आहेत की शेतकऱ्याला बांबू तोडता येत नाही. या बांबूपासून इथेनॉल मोठय़ा प्रमाणात तयार होऊ शकते व त्याच्या वापरातून प्रदूषणमुक्त वाहतूक व्यवस्था स्वस्तात चालवता येईल.

विजेच्या वापरातून हवेतून चालणाऱ्या डबलडेकर बसेस चालविण्याची योजनाही गडकरी यांनी सांगितली. मेट्रोसाठी प्रतिकिमी सुमारे ३५० कोटी रुपये खर्च येतो तर या विजेवर चालणाऱ्या बसेससाठी ३५ ते ५० कोटी रुपयेच खर्च येईल असेही ते म्हणाले.  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसेस धावल्यास खाजगी वाहनांचीही गरज राहणार नाही. आगामी काळात विजेवर चालणाऱ्या डबलडेकर बसेसचे धोरण आणणार असून मुंबई ते दिल्ली महामार्ग तसेच बडोदा ते अहमदाबाद ते दिल्ली महामार्गावर शेवटची लेन विजेवरील मार्गिका असेल. या बसेस शहरात आल्यानंतर डिझेलवर चालविल्या जातील असेही गडकरी यांनी सांगितले. ग्रामीण भागात बायोगॅस व मिथेन गॅस तयार केल्यास गावे समृद्ध व संपन्न होतील. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर देशाची अर्थव्यवस्था पुढे नेण्याची गरज असून ती संपूर्ण स्वदेशी असेल असेही गडकरी यांनी सांगितले.

..तर बसभाडे कमी

मिथेनॉल आधारित अपारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर करणारी वाहतूक यंत्रणा मुंबईत राबवल्यास मुंबईतील बसभाडे किमान तीस टक्क्याने कमी होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतागृहातून हा मिथेन वायू उपलब्ध होऊ शकेल. यातून एक हजार वातानुकूलित बसगाडय़ा चालवता येतील, असेही ते म्हणाले.

स्वप्ने दाखविणारे नेते जनतेला सुरूवातीला आवडतात पण त्याबाबत भ्रमनिरास झाला, की अशा नेत्यांवरचा विश्वास उडू लागतो. मी मात्र साकार होतील अशीच स्वप्ने दाखवितो.

नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री

मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरू असून यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन झाल्यानंतर २०१८ पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण झालेले असेल

नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री