विमानतळावर गहाळ झालेली बॅग ‘एअर इंडिया’ कंपनीकडून परत
‘एअर इंडिया-८६३ या बॅगेचे सर्व सामान पोहचले’, असे विमान कंपनीच्या व्यवस्थापकाने सांगितले आणि बदलापूरच्या मिलिंद धारवाडकर यांच्या पोटात गोळा आला. १९ ऑगस्टला दिल्लीहून ते विमानाने मुंबईत आले खरे मात्र त्यांची बॅग दिल्ली विमानतळावरून बेपत्ता झाली होती. तक्रार करूनही दोन दिवस बॅग सापडली नव्हती. अखेर दोन दिवसांच्या मानसिक ताणानंतर थेट केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनाच ‘ट्विटर’वर टॅग करत तक्रार केल्यावर काही वेळातच धारवाडकर यांची बॅग सापडली. बॅग हरवल्यावर विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेक तक्रारी करूनही नकारघंटा कानी पडल्यावर एका ‘ट्वीट’ने संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे लक्ष वेधले आणि धारवाडकर यांना बॅग मिळाली.
विमानतळावरून एरव्ही बॅग हरवण्याचे आणि दुसऱ्या विमानात अथवा भलत्याच विमानतळावर पोहचण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. १९ ऑगस्टला बदलापूरचे निवासी असणाऱ्या मिलिंद धारवाडकर यांच्या बाबतीतही बॅग गहाळ होण्याचा प्रकार घडला. ते १६ ऑगस्टला दिल्ली येथे गेले होते व १९ ऑगस्टला ‘एअर इंडिया – ८६३’ या विमानाने दुपारी १च्या सुमारास परतले. या वेळी दिल्लीहून विमान किमान एक तास उशिराने सुटल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना घरी नेण्यासाठी येणारी गाडी मुंबई विमातळावर ते पोहचण्यापूर्वीच पोहचली होती. त्यामुळे विमानातून घाईत बाहेर पडल्यावर आपले सामान शोधण्यासाठी गेले असता त्यांची बॅग मिळाली नाही. बराच वेळ वाट पाहिल्यावर त्यांनी अखेरीस कंपनीच्या विमानतळ व्यवस्थापनाकडे तक्रार केली.
दुसऱ्या दिवशी दिवसभर धारवाडकर कधी दिल्ली तर कधी मुंबईला फोन करत होते. मात्र, बॅग मिळत नसल्याचेच त्यांना कळवण्यात येत होते. अखेर २० ऑगस्टला सायंकाळी ७ च्या सुमारास निराश झालेल्या धारवाडकर यांनी ट्विटरवर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू व केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांना व एअर इंडिया कंपनीला ट्वीट करत आपली व्यथा मांडली. लगेचच साडेआठ वाजता काहीशी अनपेक्षित घटना घडली आणि धारवाडकर यांना दिल्ली विमानतळावरून एअर इंडिया कंपनीच्या व्यवस्थापनाचा फोन आला, की तुमची बॅग मिळाली आहे व दुसऱ्या दिवशी पहिल्या विमानाने मुंबईत व नंतर घरपोच पाठवून देऊ. २१ ऑगस्टला ४ वाजता धारवाडकर यांना त्यांची बॅग घरपोच मिळाली.

केवळ ट्विटरवर मंत्र्यांना टॅग केल्याने माझी बॅग मला परत मिळाली. अन्यथा कंपनीच्या ढिलाईच्या कारभारामुळे बॅग मिळेल की नाही अशी शंका माझ्या मनात आली होती. विमानतळावरील विमान कंपन्यांच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसणाऱ्यांनी आता ट्विटरचा प्रभावी वापर करावा.
– मिलिंद धारवाडकर, बदलापूर