27 May 2016

‘मातोश्री’वरील चिंताजनक रात्र

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती काल (बुधवार) रात्री अचानक बिघडल्याने आणि त्यांनी डॉक्टरांच्या उपचारांना

मुंबई | November 15, 2012 8:27 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती काल (बुधवार) रात्री अचानक बिघडल्याने आणि त्यांनी डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देणं बंद केल्यामुळे विविध तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. बाळासाहेबांच्या प्रकृतीची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखिल ताबडतोब मातोश्रीवर पोहोचले होते. बाळासाहेबांच्या प्रकृतीची बातमी वा-यासारखी शहरभर पसरल्याने हजारो शिवसैनिकांनी कलानगरचा रस्ता धरला होता. बाळासाहेबांची तब्येत नेमकी कशी आहे, याबाबत नेमकी माहिती मिळत नसल्याने काही काळ शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यात अनेक बड्या नेत्यांनी मातोश्रीला भेट द्यायला सुरूवात केल्याने बाळासाहेबांची प्रकृती नेमकी कशी आहे याबाबात संभ्रम निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा काल रात्रीपासूनच ‘मातोश्री’बाहेर तैनात करण्यात आला आहे. तसेच सर्व पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या असून, पोलिसांना कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काल रात्री धारावीहून कलानगरच्या दिशेने जाणा-या रस्त्यावर काही शिवसैनिकांनी काही गाड्यांची तोडफोड केली. दरम्यान, कलानगरकडे जाणारा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला होता.   
‍कुठलीही चुकीची घटना घडू नये आणि या परिस्थितीला गालबोट लागू नये यासाठी खुद्द शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रात्री मातोश्रीच्या गेटवर येऊन शिवसैनिकांना शांतता राखाण्याचे आवाहन केले होते. बाळासाहेबांची इच्छाशक्ती दांडगी असून मला अजून आशा आहे. ते या संकटावर मात करून नक्कीच बरे होतील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मी हात जोडून आपल्याला विनंती करतो आहे, शांतता राखा, प्रयत्न चालू आहेत, असंही ते पुढे म्हणाले. सर्वांनी बाळासाहेबांसाठी प्रार्थना करा आणि शांतता राखा, असंही उध्दव ठाकरे म्हणाले.       
काल रात्री शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली. त्यामध्ये मनोहर जोशी, अनिल देसाई, संजय राऊत, सुभाष देसाई, विनायक राऊत, रामदास कदम, दिनकर रावते यांचा समावेश होता. त्याचबरोबर अभिनेते अमिताभ आणि अभिषेक बच्चन, बप्पी लेहरी, आणि संजय दत्त आपली पत्नी मान्यतासह मातोश्रीवर पोहचले होते. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनीसुध्दा मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली. आज सकाळी अभिनेता नाना पाटेकर यांनेसुध्दा मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली.

‘यमराज हार गया’
अभिनेता अमिताभ बच्चन यांनी काल रात्री बाळासाहेबांची भेट घेतली आणि घरी गेल्यावर बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करताना जुन्या आठवणींना उजाळा देत काही ट्विट्स केले. बाळासाहेब ठाकरे हे लढवय्ये आहेत, असं ते म्हणाले. मला ‘कुली’ चित्रपटाच्या वेळा अपघात झाला होता तेव्हा माझ्यासाठी ते एक व्यंगचित्र घेऊन आले होते. त्यावर लिहिलं होतं, ‘यमराज हार गया’. मी सुध्दा व्यंगचित्रकार असतो तर, मीसुध्दा त्यांच्यासाठी व्यंगचित्र काढून घेऊन गेलो असतो आणि त्यावर लिहिलं असतं ‘यमराज हार गया’. जेव्हा जया घरी लग्न करून आली तेव्हा त्यांनी आम्हाला घरी बोलवून घेतलं होतं आणि तीचं एखाद्या सुनेसारखं स्वागत केलं होतं. त्यानंतर आम्ही त्यांच्या कुटुंबाचा भाग झालो होतो. तसेच बोफोर्स घोटाळ्यात माझं नाव आलं, तेव्हा त्यांनी मला घरी बोलवून घेतलं आणि विचारलं हे सर्व खरं आहे का? जर खरं नसेल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही.

First Published on November 15, 2012 8:27 am

Web Title: bal thackeray ailing shiv sena supremo extremely critical