‘निसर्ग उद्यान’चे प्रमुख सुधीर म्हात्रे यांनी अहोरात्र खपून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी उद्यान उभारणीचे काम १७ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण केले खरे; परंतु  तेव्हापासून गेले पाच महिने पालिकेत राहुल शेवाळे यांच्यासारखे ‘कर्तबगार’ स्थायी समितीचे अध्यक्ष असताना बिलासाठी पालिकेत चपला झिजवूनही आजपर्यंत म्हात्रे यांना त्यांचे बिल का मिळाले नाही, असा सवाल सर्वपक्षीय नगरसेवक करीत आहेत.
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याचे काम आठ दिवसात निसर्ग नर्सरीने केले. मुळात २० फूट बाय ४० फूट (८०० चौरस फूट) आकारमानाचे उद्यान वाढून साडेआठ हजार चौरस फूट करण्यात आले. या उद्यानात स्टीलचे कुंपण, एलईडीसह परदेशी झाडे लावण्यात आली असून यासाठी विक्रीकर नोंदणी क्रमांक तसेच व्हॅट लावलेले बिल सादर करणे आवश्यक आहे. सुधीर म्हात्रे यांच्याच म्हणण्यानुसार त्यांनी असे बिल सादर केलेले नाही. ज्यांनी शिवसेनेप्रमुखांचे स्मारक उत्तमप्रकारे बनवले त्यांना बिल सादर करण्यात अथवा कागदपत्रे सादर करण्याच्या तांत्रिक बाबींसाठी मदत करून वेळेत बिल मिळवून देण्यास पालिकेतील सेनेच्या नेत्यांना कोणी रोखले होते? मराठी उद्योजकाला संपविण्याचा डाव असल्याचा आरोप ‘सामना’मधून ‘लोकसत्ता’वर करण्यापूर्वी वेळेत बाळासाहेबांचे स्मारक बनविणाऱ्या मराठी म्हात्रे यांना राहुल शेवाळे यांनी का मदत केली नाही? म्हात्रे गेले पाच महिने बिलासाठी टाचा घासत असताना गप्प बसलेल्या राहुल शेवाळे यांना सेना नेत्यांनी का जाब विचारला नाही? असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात येत आहे. व्हॅट आणि विक्रीकर नोंदणी क्रमांक असलेले बिल दिल्याशिवाय निसर्ग नर्सरीला त्यांच्या कामाचे पैसे देता येणार नाही, असे पालिका प्रशासनातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या सांगितले तर नेमकी कितीवेळा येथील झाडे बदलण्यात आली व त्याची नोंद कोणी ठेवली याबाबत पालिकेचे अधिकारीही मौन पाळून आहेत. राहुल शेवाळे यांनी आपल्याला काम करण्यास सांगितल्याचे म्हात्रे यांचेच म्हणणे आहे. काम केल्यानंतर पालिकेत अनेकदा बिलासाठी चकरा मारूनही आजपर्यंत आपल्याला एकही पैसा मिळालेला नाही, असेही त्यांनीच सांगितले. बाळासाहेबांचे वेळेत स्मारक करणाऱ्या मराठी उद्योजकाला त्याच्या कामाचे व घामाचे हक्काचे पैसे पालिकेत शिवसेनेची सत्ता असताना का मिळात नाही, हा खरा सवाल आहे. यात मनसेचा संबंध येतोच कुठे, असा सवाल मनसेकडून करण्यात येत आहे.