बाळासाहेब ठाकरे आणि गर्दी हे गेल्या चार दशकांतील महाराष्ट्राच्या राजकीय सभांचे एकमेव समीकरण झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत, प्रखर विचारांतून आणि अंगार चेतविणाऱ्या भाषणांतून शिवसैनिक जागा झाला, आणि तमाम मराठी बांधवांची अस्मिता फुलली. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे शिवसैनिकांसाठी बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटण्याची अविस्मरणीय संधी.. अशा अनेक दसरा मेळाव्यांमध्ये बाळासाहेबांनी आपल्या ज्वलंत विचारांचे सोने अक्षरश उधळले, आणि त्या मुशीतूनच शिवसैनिक घडत गेला.. अशाच काही अविस्मरणीय भाषणांतून निवडलेले विचारांच्या सोन्याचे हे काही वेचक कण..

कुणी फसवलं की खूप दु:ख होतं
आयुष्यात मी दोन गोष्टींचा कमालीचा तिरस्कार केला. एक, अप्रामाणिकपणा, आणि दुसरी, बेईमानी.. कुणी फसवलं की मला खूप दु:ख होतं. मी विश्वास टाकतो, तेव्हा हातचं काही राखून ठेवत नाही. म्हणून माझं म्हणणं, शब्द देताना दहा वेळा विचार करा.. पण एकदा शब्द दिल्यावर तो पाळा!

कुणी माझ्या पाठीत वार करू नये
माझी एक अपेक्षा आहे, की माझं म्हातारपण अत्यंत निवांतपणे जावं.. आतापर्यंत मी जे कार्य उभं केलं आहे, त्याबाबत कुणी माझ्या पाठीत वार करू नये. लोकांनी माझा विश्वासघात करू नये. मी तर लोकांचा विश्वासघात निश्चितच करणार नाही

सहकाऱ्यांचा वाटा मोठा
कुठल्याही नेत्याच्या यशात त्याच्या सहकाऱ्यांचा वाटा मोठा असतो. आज शिवसेना हे एक कुटुंब बनले आहे. दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, वामनराव महाडिक, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, दत्ताजी नलावडे, सतीश प्रधान, मधुकर सरपोतदार, इत्यादी नेत्यांचं आणि माझं असलेलं नातं हे बंधुत्वाचं आहे.. प्रसंगी रागावण्याचा, हजेरी घेण्याचा त्यांनीच दिलेला अधिकार मी बजावतो, पण त्यांचंही मत आणि विचार ऐकायला मी उत्सुकही असतो..

शिवसैनिक कसा असावा
शिवसैनिक कसा असावा, याच्या माझ्या काही कल्पना आहेत. मराठी माणसाचं हित हे त्याच्या नजरेसमोर ध्रुवताऱ्यासारखं चमकत असावं. आपल्या मराठी बांधवांची सेवा करताना त्यानं चंद्रासारखं शीतल असावं, तर विरोधी क्षुद्र जंतूंचा नाश करताना त्यानं सूर्यासारखं प्रखर असावं..

भगवा झेंडाच तिरंग्याचे रक्षण करेल
शिवसेनेची भूमिका, आम्ही महाराष्ट्रात मराठी, तर हिंदुस्थानात हिंदू आहोत. गर्व से कहो, हम हिंदू है. सगळ्या हिंदूंनी एकत्र येण्याची गरज असून भगवा झेंडा हाच तिरंग्याचे रक्षण करणार आहे.. मी अखेपर्यंत हिंदुत्वाचा प्रचार करणार, करणार आणि करणारच!

शिवसैनिक हीच माझी संपत्ती
माझं खरं भांडवल, माझे शिवसैनिक.. शिवसैनिक ही माझी कवचकुंडलं आहेत. लाखो शिवसैनिक हीच माझी संपत्ती.. ही संपत्ती जप्त करू शकेल असा कायदा आणि कोर्ट अजून अस्तित्वात यायचं आहे..

मी स्वतसाठी काहीच करत नाही
मी माघार कधी घेतली नाही, आणि घेणारही नाही. आमचा मार्ग बरोबर आहे, याची जाणीव आम्हाला आहे. आणि आम्ही जे करतो ते लोकांसाठी करतो.. स्वतसाठी काहीच करत नाही.

शिवसेना ही शिवसेनाच राहिली पाहिजे..
‘‘ही जी जाग आहे ना, ती शिवसेनेने आणलीय.. ती कधीच मरायची नाही. ते तेज कायम राहणार. पण पुढे चालवायचं कसं, कोणी, आणि किती पारदर्शक विचाराने, हा प्रश्न नंतरचा आहे. तो नंतरच उभा राहील.. जो कोणी असतील चालवणारे, त्यांनी फक्त शिवसेनेची काँग्रेस होणार नाही याचीच काळजी घ्यावी. शिवसेना ही शिवसेनाच राहिली पाहिजे.. जोपर्यंत लोकांमध्ये जाग आहे, तोवर शिवसेनेला कुणीच धक्का लावू शकणार नाही. मी असलो काय अन् नसलो काय.. तरी पण! ही जाग बऱ्याच लोकांमध्ये आहे. तेव्हा पाचकळपणा आणि चावटपणा कोणाला करू देणार नाही’’..