बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांचे सोने लुटण्यासाठी तमाम शिवसैनिक दर वर्षी विजयादशमीच्या संध्याकाळी शिवाजी पार्क मैदानावर दाखल होतात. या वर्षी मात्र,  दसरा मेळाव्यात बाळासाहेब उपस्थित नसल्याने शिवसैनिकांच्या मनात चिंतेचे सावट दाटले. बाळासाहेबांनी त्या संध्याकाळी ध्वनिचित्रफितीद्वारे सैनिकांशी संवाद साधला, पण त्यामुळे कार्यकर्त्यांची धाकधूक अधिकच वाढली..
‘‘मी थकलोय.. शारीरिकदृष्टय़ा कोसळलोय.. बोलतानाही धाप लागतेय. मला चालताही येत नाही, दिवसभर पडून असतो. हा कसला आजार? मला तुम्हाला भेटण्याची तीव्र इच्छा होती. पण जाऊ द्या.. मी ४५ वर्षे शिवसेना सांभाळली, तुम्हाला सांभाळलं. आता तुम्ही उद्धव, आदित्यला सांभाळा.. इमानाला महत्व द्या. मी तुमच्यावर घराणेशाही लादली नाही. ती तुम्ही स्वीकारली. आता तुम्हीच सांभाळून घ्या’’.. असे कळकळीचे आवाहन त्या दिवशी बाळासाहेबांनी केले आणि शिवसैनिकांच्या शिवतीर्थावरचा माहोलच पुरता बदलून गेला. तलवारीच्या तळपत्या पात्यासारखे शब्द कानात ओतून शिवसैनिकांमध्ये दर वर्षी नवा जोष पेरणाऱ्या बाळासाहेबांचे ते अतिशय केविलवाणे शब्द ऐकून शिवतीर्थ हेलावून गेले. अनेकांना अश्रू अनावर झाले आणि बाळासाहेबांच्या प्रकृतीची काळजी आणखीच गहिरी झाली. आपल्या त्या अखेरच्या भाषणात बाळासाहेबांनी राजकारणावर नेहमीच्या ठाकरी शैलीत कोरडे ओढले आणि दिल्लीपासून नांदेड महापालिकेपर्यंत सर्वत्र सुरू असलेल्या काँग्रेसी राजकारणाचाही समाचार घेतला, शिवसेनेचा गड असलेल्या दादरमधील पराभवाची खंतदेखील त्यांनी बोलून दाखविली, पण बाळासाहेबांना व्यासपीठावर प्रत्यक्ष पाहण्यासाठी आतुरलेल्या शिवसैनिकांमध्ये त्या शब्दांनी जोश संचारलाच नाही..  
‘‘डॉक्टरांनी माझ्या शरीराची जणू प्रयोगशाळा करून टाकली आहे. नऊ दिवसांचा हा आजार असा कसा?.. जरा रिअ‍ॅक्शन झाली, की घ्या गोळ्या.. त्यांची रिअ‍ॅक्शन झाली की पुन्हा त्यावरही गोळ्या.. याला काही अर्थ नाही. उद्धव काम करत राहिला. नशीब, कुठे परदेश दौऱ्यावर नव्हता. वेळेवर आला बरं झालं.. त्याची अँजिओप्लास्टी झाली, तो घरी आला, आणि आमची रवानगी इस्पितळात झाली.. सगळे रिपोर्ट आले, पण माझं हृदय ठीक होतं. ते असणारच, कारण ते तुमच्याकडे आहे.. ते मी कोणालाही देणार नाही.. आता शारीरिकदृष्टय़ा कोसळलोय.. ४५ र्वष मी शिवसेना सांभाळली. अनेक दौरे केले, मैदानं गाजवली आणि आज असं काही होतंय’’.. असे शब्द  बाळासाहेबांच्या तोंडून बाहेर पडले, तेव्हा अनेकांना हुंदका अनावर झाला होता.
.. त्या दिवसापासून जवळपास दररोजच, बाळासाहेबांच्या प्रकृतीच्या काळजीने शिवसैनिकांना घेरले. जागोजागी प्रार्थना सुरू झाल्या.. सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या आरोग्यासाठी मंदिरे, तीर्थक्षेत्रे गाठली आणि बाळासाहेबांच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी देवाला साकडे घातले..
त्या भाषणात बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या शिवसेनेसोबतच्या नात्याची वीणही भावनात्मक साद घालून घट्ट केली. ते म्हणाले, ‘‘आज मी ८६ वर्षांचा आहे. गेली ४५ र्वष मी शिवसेना सांभाळली. हे दादर सांभाळलं. पण आज या दादरचेच दोन तुकडे झाले. ज्या दादरमध्ये मी शिवसेमा भवन उभं केलं, तेथेच दोन तुकडे पाडले गेले. असं व्हायला नको होतं.’’ बाळासाहेबांच्या या शब्दांत राज ठाकरे पक्षाबाहेर पडल्याची वेदना स्पष्ट उमटली होती. ‘‘एकत्र या आणि काँग्रेसला धूळ चारा’’ हे त्यांचे पुढचे शब्दही राज ठाकरे यांच्यासाठीच होते, हे शिवसैनिकांना स्पष्टपणे जाणवले.
‘‘कृपा करा आणि उठा.. आवाज करा.. तिकडे छोटे देश आंदोलनं करत आहेत. तुमच्या अंगात रक्त आहे की नाही? तुमच्या रक्तात धमक असेल तर उठा.. माझ्यावर कृपा करा’’.. असे आवाहन करून थकल्या आवाजातही बाळासाहेबांनी आपल्या शब्दांचे अंगार शिवसैनिकांच्या रक्तात भिनविण्याचा प्रयत्नही केला..
.. शिवाजी पार्कच्या मैदानावर दसरा मेळाव्यासाठी वर्षांनुवर्षे हजेरी लावणारा शिवसैनिक विचारांचे सोने लुटून, भारावल्या आणि चेतविलेल्या अवस्थेत घरी परतत असे. त्या मेळाव्यानंतर मात्र प्रत्येक शिवसैनिक मनावर एका काळजीचे ओझे घेऊन जडपणे परतत होता..