बाळासाहेब म्हणजे चैतन्य, अनेक वर्षांपूर्वी  घडलेल्या गोष्टींची अचूक आठवण, पाण्याच्या धबधब्याप्रमाणे वाहणारा विनोदाचा झरा, दर दिवशी उगवणाऱ्या नि तरीही प्रत्येक दिवशी नवीन भासणाऱ्या सूर्याप्रमाणे बाळासाहेबांच्या सुपीक डोक्यातून निघणाऱ्या कल्पनाही मनाला धक्का देत असतात. त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा केल्यावर मला नेहमीच प्रश्न पडतो.. बाळासाहेब नक्की कोण?  राजकारणी की व्यंगचित्रकार? मला वाटते, व्यंगचित्रकला ही बाळासाहेबांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होती. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे या कलेची प्रेरणा होती.
बाळासाहेबांना एक व्यंगचित्रकार म्हणून जवळून पाहण्याचा योग गेल्या काही वर्षांत आला. नेमकं सांगायचं तर, ‘मनसे’ची स्थापना व माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देऊन नंतर पाठीवर थाप मारून स्वागत करण्याच्या बाळासाहेबांच्या रिवाजाची सुरुवात एकाच वर्षांत झाली. राज ठाकरे (शिवसेना सोडण्यापूर्वी)
‘मार्मिक’ दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ करीत होते. त्यांनी शिवसेना सोडल्यावर ती जबाबदारी बाळासाहेबांनी माझ्यावर सोपवली. गेली सहा वर्षे मुखपृष्ठ करण्याच्या निमित्ताने एका पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सहवास मला लाभला. अचूक मार्गदर्शक आणि व्यंगचित्रकला ज्याच्या हाडामांसात भिनलेली आहे, असं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व मलाही दिसू लागलं.
अगदी या ऑक्टोबरातच त्यांच्याशी तीनदा चर्चा करण्याचा योग आला. मार्मिक दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासंदर्भातच ही चर्चा होती. तब्येत बरी नाही असं बाळासाहेब सांगत होते- ‘भूक लागत नाही, वजन कमी होत चालले आहे, जरासा भात, सूप व इतर खाद्यपदाथाीचे दोनतीन तुकडे एवढेच जेवण जाते. दिवसाला 22 गोळय़ा. शिवाय दृष्टीही दगा द्यायला लागली आहे..’ आणि तरीही ते मला थरथरत्या हाताने जमेल तसे ड्रॉइंग काढून दाखवत, स्वतची कल्पना सांगत, एवढेच नाही तर त्या व्यंगचित्राखालची कॅप्शनही अचूक सांगत.
तिसऱ्यांदा गेलो ते रंगीत, फायनल व्यंगचित्र त्यांच्यासमोर पसंतीला ठेवण्यासाठी. हा एका मुखपृष्ठासाठी तीन भेटींचा शिरस्ताही नेहमीचा. प्रत्येक वेळी ते चित्र निरखून पाहणार, त्यात जराही चूक त्यांना चालत नसे. त्यांची नजर म्हणजे हजारो फुटांवरूनही नेमके पाहणाऱ्या घारीसारखीच.  पण गेल्या महिन्यात, बाळासाहेबांनी स्वत चितारलेल्या व्यंगचित्रांचे भांडार माझ्यापुढे ठेवले. त्यांनी मला दाखवली असतील अवघी 20 ते 25 चित्रे. तरीही ते भांडारच, कारण एवढय़ा वर्षांत मी कधीही त्यांची ‘ओरिजिनल’ चित्रं पाहिली नव्हती. एकेक चित्र दाखवताना प्रत्येकाचे मर्म ते सांगत होते. बारीक व जाड फटकाऱ्यांतून त्यांनी साधलेला पर्स्पेक्टिव्ह,  कलर बॅलन्स हे सारे त्यांच्या तोंडून ऐकणे हा अनुभव म्हणजे, उत्खनन करता करता सुंदर ऐतिहासिक शिल्प सापडावे, तसा होता!
हे सारे सांगतानाही त्यांच्या खुर्चीच्या बाजूला त्यांची पाठराखण करणारे मोठय़ा आकारातील (साधारण 15 बाय 12 इंच) व्यंगचित्रकलेत बाळासाहेबांनी गुरू मानलेल्या डेव्हिड लो यांचे भारताच्या संरक्षणाची दुर्दशा दाखवणारे ‘ओरिजिनल’ व्यंगचित्र होते. व्यंगचित्रे मोठय़ाच आकारात काढणे बरे वाटते, असे बाळासाहेब म्हणत पण मी पाहात होतो ती व्यंगचित्रे साधारण तीन वा चार कॉलमचीच होती. म्हणजे आकाराने लहानच, तरीही त्यामध्ये पाच-सहा मनुष्याकृती.. प्रत्येक व्यक्तीचे चित्रण अगदी पक्के. फटकारे अगदी तोलून-मापून मारलेले. कंट्रोल्ड. एखादा फटकारा आपल्याला हवा तसा जमला नाही म्हणून तेवढय़ापुरता पांढरा रंग सर्वच व्यंगचित्रकार लावत असतील, पण बाळासाहेबांच्या तेवढय़ा चित्रांमध्ये फक्त एकदाच मला तसा पांढरा केलेला एकच चुकार फटकारा दिसला. माझ्या दृष्टीने हा चमत्कारच- बाळासाहेबांचा रियाज, चित्रकलेची जबरदस्त ओढ आज्ण हातामध्ये असलेले कौशल्य यांच्या संगमातून घडलेला.
एवढं अचूक साधलं कसं, या प्रश्नावर बाळासाहेबांचं उत्तर-‘ अरे एकदा हातात ब्रश आले की होऊन जाते.. अगदी सहज.’
बाळासाहेबांनी ही कला स्वत:च्याच निरीक्षणाने, चित्रकलेच्या ध्यासाने, रियाजाने अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवली. लहानपणी ते चित्रे काढीत म्हणून दादांनी- म्हणजे प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी ती चित्रे बाबूराव पेंटरांना दाखवली. प्रबोधनकारांकडे नेहमी येणारे बाबूराव पेंटर ती चित्रे पहिल्यांदा पाहून म्हणाले होते, ‘अरे याला जे. जे.  स्कूल ऑफ आर्ट मध्ये घालू नकोस, पाहिजे तर माझ्याकडे पाठव. करतो आहे ते छान आहे. प्रॅक्टिस करायला लाव’. त्याप्रमाणे दादा नेहमी बाळासाहेबांना इंग्लिश नियतकालिके आणून देऊ लागले आणि त्यातील व्यंगचित्रांचे निरीक्षण आणि आवडलेल्या व्यंगचित्रांची कॉपी या प्रकारे बाळासाहेबांची ‘प्रॅक्टिस’ सुरू झाली. या शिकण्यादरम्यान त्यांना प्रख्यात ब्रिटिश व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांच्या व्यंगचित्रकारांनी वेड लावले. लो यांच्या व्यंगचित्रांतील मार्मिकता, त्यांची रचना, बॅलन्स, अ‍ॅनाटॉमी (हो, व्यंगचित्रांतल्या शरीरांच्या रचनेचेही शास्त्र- अ‍ॅनाटॉमी- असते. फक्त हे शास्त्र पुस्तकी नसते, तर प्रत्येक व्यंगचित्रकार ती अ‍ॅनाटॉमी आपापल्या स्टाइलप्रमाणे ठरवतो-) तसेच लो यांनी वापरलेल्या कॅप्शन्स वा कॉमेंट्स या सर्व गुणांनी बाळासाहेब राजकीय व्यंगचित्रांकडे अधिक डोळसपणे पाहू लागले. इतर व्यंगचित्रकारांनीही बाळासाहेबांवर दुरूनच प्रभाव पाडला, त्यांत ब्रिटिश व्यंगचित्रकार बेन बेनरी व स्ट्रॅव्ब यांची नावे वरची. परंतु बाळासाहेबांचा देव एकच, तो म्हणजे डेव्हिड लो!
कोणा भारतीय चित्रकाराचा प्रभाव त्यांच्यावर पडलाच नाही का? बाळासाहेब एक नाव आवर्जून घेत. ‘मी जो चित्रकार झालो, त्याची स्फूर्ती मिळाली एका हरहुन्नरी चित्रकारामुळे- त्याचे नाव दीनानाथ दलाल’ असे बाळासाहेब सांगत.
तसे पाहिले तर बाळासाहेबांचे उणेपुरे शिक्षण मराठी सहावीपर्यंतच. पण त्यांच्याशी बोलताना असे वाटे की, एका उच्चविद्याविभूषित व्यक्तीशी आपण बोलतो आहोत. त्यांचे प्रत्येक विषयाबद्दलचे ज्ञान ताजे असे ते त्यांच्यातल्या कलावंताच्या जिज्ञासेमुळे. ‘मी नेहम जिज्ञासेनेच प्रत्येक गोष्टीकडे पाहातो. गाडीमधून प्रवास करताना मी कधी झोपत नाही. आजूबाजूचा निसहर्ग न्याहाळत असतो’  हे बाळासाहेबांचे उद्गार यासंदर्भात आठवतात.
ते नेहमीच इतर कलाकारांचा सन्मान करत. आपल्यापेक्षा लहान आहे, मग त्याने केलेल्या कामाला दाद का द्यावी असा विचार (जो काही महान चित्रकारही करतात) बाळासाहेबांच्या मनाला शिवत नाही.
एकदा मार्मिकच्या दिवाळी अंकाचे कव्हर करताना त्यांनी मला त्यांची कल्पना चितारून दाखवली. परंतु ते समाधानी दिसत नव्हते. थोडय़ा वेळाने मी जरा धैर्य एकवटून त्यांना विचारले., ‘साहेब, मीही दोनतीन कल्पना चितारल्या होत्या, दाखवू का?’ (ही सवय मार्मिकचे दिवंगत कार्यकारी संपादक वसंत सोपारकर  यांनी लावली. साहेबांकडे जाताना तुला जे विषय महत्त्वाचे वाटतात त्यावर दोनचार स्केच तयार ठेवून घेऊनच जा, साहेबांनी विचारले तर फजिती नको, असे सोपारकर सांगत.) तर माझी ती स्क्रिबल्स बाळासाहेबांनी पाहिली व म्हणाले, ‘ही तुझी कल्पना आपण कव्हरसाठी वापरूया आज्णि मी केलेली आतल्या पेजवर वापरूया.’ मी अवाक झालो.
व्यंगचित्रकलेत बाळासाहेबांचा आवडता विषय आहे ‘कॅरिकेचर’. या अर्कचित्रांमध्ये ‘लाइकनेस’ महत्त्वाचा, त्यात जराही तडजोड त्यांना खपत नसे. हा आग्रह त्यांची कॅरिकेचर पाहतानाही  जाणवतो. त्यांची अनेक कॅरिकेचर ‘मास्टरपीस’ ठरतील, त्यापैकी मला आवडते ते नेहरूंचे- तोंडात रबरी निपल असलेले दुडदुडणाऱ्या बालकाचे रूप त्या नेहरूंना बाळासाहेबांनी दिले आहे. विषयार अगदी अचूक बोट ठेवणारे हे परिणामकारक कॅरिकेचर आहे. कॅरिकेचरिस्ट म्हणून त्यांचे अनेक आवडते व्यंगचित्रकार होते, पण त्यामध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख अगदी नेहमीचा.‘राजा कॅरिकेचर छान काढतो’ असे ते नेहमी म्हणत.
भीमसेन जोशींचे मी केलेले कॅरिकेचर बाळासाहेबांचे आवडते. कधीकधी विचार येई माझ्यासारख्या लहानशा कलाकारांनाही ते एवढा मान का देतात. प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीने कसे काय वागतात. मला वाटते त्यांची चाणाक्ष नजर ती ‘जिवंत’ व्यक्ती शोधत असते. एकदा जिवंतपण हेरले की ते त्या व्यक्तीला घडवतात. अगदी शिल्पकारासारखे.  या खुबीमुळेच त्यांनी राजकारणातही अनेक माणसांना घडवले.
बाळासाहेब हे शिक्षकच!  व्यंगचित्रासंदर्भात चर्चा करताना ते व्यंगचित्र कसे असावे, कसे असू नये, त्याची रचना आणि त्याचे मर्मस्थळ, यासंबंधी सारे काही समजून सांगावेसे त्यांना वाटे. अशा वेळी त्यांच्या ‘खजिन्या’तील अनेक परदेशी व्यंगचित्रकारांची पुस्तकेही ते आवर्जून समोर ठेवत. त्यातली नेमकी चित्रे दाखवत.
या ‘मार्मिक’च्या सफरीत त्यांची अनेक रूपे पाहिली-  बाप, शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, खटय़ाळ मित्र, घरगुती साधा माणूस, विनोदकार, नकलाकार, अजातशत्रू..
इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेल्या ‘डब्ल्यू. एस. सी.-  अ कार्टून बायोग्राफी’ या निवडक व्यंगचित्रकारांच्या पुस्तकामध्ये छापलेले एकमेव भारतीयाचे- बाळासाहेबांचे व्यंगचित्र आणि त्याबद्दल सांगताना बाळासाहेबांच्या चेहऱ्यावर दिसणारा सार्थ अभिमान, पु. ल. देशपांडे आणि आर. के. लक्ष्मण या विनोदकारांबद्दल जानी दोस्तासारखा वाटणारा लळा, शत्रुघ्न सिन्हाशी फोनवरून बोलताना त्याच्याचसारखा आवाज काढून केलेला संवाद, फार वर्षांपूर्वी भेटूनही सत्य साईबाबांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल, उद्धवजी व राज यांच्यामध्ये अंतर वाढतच गेले असूनही राज यांच्याविषयी त्यांच्या मनात कायम असणारी ओढ, माझ्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण द्यायला तिच्यासहित गेलो असताना कुंकवाचा करंडा सेक्रेटरीला आणायला लावून मुलीला कुंकू लावण्याची केलेली आईसारखी सूचना, एकेकाळी भाषणांनी मैदान गाजवणारा मी असा बसलो आहे असे हताश उद्गार काढणारे बाळासाहेब.. ही रूपे आता कोरली गेली आहेत.
अशी ‘बापा’ची भूमिका बजावणारे, व्यंगचित्रकार आणि एका राजकीय पक्षाचा अव्वल नेता असलेले बाळासाहेबांसारखे व्यक्तिमत्त्व पृथ्वीतलावर दुसरे असू शकेल का?

जगातल्या कुठल्याही चांगल्या व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींशी तुलना केल्यावर उणेपण वाटू नये, असे गुण तुमच्या व्यंगचित्रांमध्ये आहेत. आवश्यक निर्भयता आहे. रेखाटणांत विलक्षण सहजता आहे. आमच्या बोरूच्या बहादुरीपेक्षा तुमच्या कुंचल्याची शक्ती दांडगी. दोन रेषांत तुम्ही मी-मी म्हणवणाऱ्याला लोळवू शकता. शंभर शब्दांनी जे साधणार नाही, ते तुम्ही ब्रशाच्या एका फटकाऱ्याने निभावून नेता. त्यातून चित्रकला ही साऱ्या डोळस मानवांना कळणारी भाषा. भाषाभेदाचे अडसर तुमच्या आड येत नाहीत. कुठल्याही स्तंभलेखकापेक्षा तुमचे सामथ्र्य मोठे; पण सामथ्र्य जितके मोठे, तितके ते किती बेताने वापरावे, याची जबाबदारीही मोठी. –पु.ल. देशपांडे

Shadashtak Yog 2024 and Impact on Rashi in Marathi
Shadashtak Yog: १८ वर्षांनंतर केतू- गुरुचा विनाशकारी ‘षडाष्टक योग’, ‘या’ राशीच्या लोकांवर कोसळणार संकट?
how to make kala masala at home recipe
Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता